yuva MAharashtra महाराष्ट्राचा अवघड पेपर अमित शहा कसा सोडवणार?

महाराष्ट्राचा अवघड पेपर अमित शहा कसा सोडवणार?



सांगली समाचार - दि. ५ मार्च २०२४
मुंबई - भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आपल्या तयारीची सज्जता सिध्द केली आहे. मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकाही नेत्याचे किंबहुना दिग्गज नेत्याचे नाव नाही. त्यावरून महाराष्ट्रातील जागावाटप हे आज भाजपसमोर देशातील सगळ्यांत मोठे आव्हान असल्याचे सिध्द होते आहे. पक्षाचे चाणक्य म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्या अमित शहा यांचीच आता महाराष्ट्राचा तिढा सोडवताना मोठी कसोटी लागणार आहे.

राज्यात जागावाटपाच्या संदर्भात दावे प्रतिदावे केले जात आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजपसोबत आहे. त्यांनाही जागा सोडाव्या लागणार आहे. हे काम वाटते होते तेवढे सोपे नाही याची प्रचिती आता भाजपला आली असावी. आता उद्या म्हणजे मंगळवारी अमित शहा राज्याच्या भेटीवर आहेत. या भेटीतच काहीतरी कोंडी फुटण्याची शक्यता आहे. 


शहा यांची विदर्भातील अकोला येथे बैठक होणार असून त्यात निवडणुकीच्या रणनीतीची चर्चा केली जाणार आहे. आघाडीत काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या सोडवण्याचाच त्यांचा प्रयत्न असणार आहे. अमरावती, चंद्रपूर, सिंधुदुर्ग- रत्नागिरी, पुणे जिल्ह्यातील शिरूर हे काही मतदारसंघ कळीचे मुद्दे ठरले आहेत. काही ठिकाणी भाजप- शिवसेना तर काही ठिकाणी भाजप- राष्ट्रवादी असा संघर्ष आहे. दरम्यान, निर्माण झालेल्या कथित कोंडीबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कोणत्याही पक्षावर अन्याय होणार नाही. मतदार संघातील स्थिती आणि निवडणूक जिंकण्याची ताकद या आधारावरच जागा वाटप होणार आहे. आघाडीतील तीनही सहकारी पक्षांपैकी कोणावरही चुकीचा प्रभाव पडणार नाही याची काळजी घेतली जाईल.