Sangli Samachar

The Janshakti News

मातोश्रीवरून आलेला शब्द मागे फिरणार नाही, सांगली लोकसभा शिवसेनाच लढणार; चंद्रहार पाटलांची गर्जना!



सांगली समाचार - दि. १३ मार्च २०२४
सांगली - डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना ठाकरे गटातील प्रवेशानंतर सांगलीत ठाकरे गट रिचार्ज झाला आहे. पैलवान चंद्रहार पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा ठाकरे गट शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा सांगलीवाडीत पार पडला. यामध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी सांगली लोकसभा निवडणूक लढवण्याची आक्रमक भूमिका जाहीर केली. शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील आणि पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडला.

लढताना विचाराने लढा, दुसऱ्या कोणत्याही भानगडीत पडू नका

यावेळी बोलताना चंद्रहार पाटलांनी लोकसभा उमेदवारीबाबत शब्द दिला आहे. याचा साक्षीदार मातोश्री असून कोणत्याही परिस्थितीत सांगलीची लोकसभा निवडणूक आपण लढवणारच आणि ती जिंकणार देखील असा विश्वासही चंद्रहार पाटलांनी यावेळी व्यक्त केला. चंद्रहार पाटलांबरोबर लढताना विचाराने लढा, दुसऱ्या कोणत्याही भानगडीत पडू नका, आपण कुठेच तुम्हाला अडवणार नाही आणि कमी पण पडणार नाही, असा इशारा दिला. सांगली लोकसभा लढवणार आणि जिंकणार, असेही पुन्हा एकदा चंद्रहार पाटलांनी जाहीर केले आहे.


दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चंद्रहार पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा चंद्रावर पाटील यांचे जोरदार स्वागत करताना हा मर्द दिल्लीला पाठवायचा असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटील मैदानात असणार का? याची चर्चा रंगली आहे. चंद्रहार पाटील यांनी सुद्धा सांगली लोकसभा शिवसेनेची असल्याचे म्हटले आहे.

माझ्या फिरण्याला शिवसेनेनं आधार दिला

चंद्रहार पाटील म्हणाले की, मला सातत्याने विचारणा करण्यात आली. कोणताही पक्ष नसल्याने त्यामुळे सातत्याने काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होतो. काहींनी विचारलं बैलगाडी स्पर्धा भरून मते मिळतात का? पण मी काहीतरी करू शकतो. मात्र, निष्क्रिय नाही. गेल्या दोन वर्षापासून मी नुसताच फिरत होतो. मात्र माझ्या फिरण्याला शिवसेनेनं आधार दिला. तो मी कधीच विसरणार नाही. ते पुढे म्हणाले की, मला आदेश असल्याने फारसं बोलता येणार नाही. मात्र, मी फार काळ शांत राहू शकत नाही. कारण आता पैलवान आणि शिवसेना एकत्र आले आहेत. त्यामुळे चंद्रहार पाटलाशी लढताना विचार करून लढा, असे आव्हान त्यांनी दिले. आपल्यावर विश्वास टाकला तो विश्वास पात्र ठरवण्याचा आपण प्रयत्न करणार असून सांगली लोकसभेची जागा शंभर टक्के जिंकणार असल्याचे ते म्हणाले.