Sangli Samachar

The Janshakti News

"140 कोटी भारतीय मोदींचं कुटुंब आहे तर त्यांनी जनतेचा विश्वास का तोडला, अन्याय का केला?"




सांगली समाचार - दि.५ मार्च २०२४
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "माझा देश माझं कुटुंब आहे" या विधानावर काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी जोरदार निशाणा साधला आहे. "आमची प्राथमिकताही देशातील जनता आहे. महागाई, बेरोजगारी, आर्थिक अस्थिरता आणि ध्रुवीकरणाविरोधातही आम्ही देशवासीयांचा आवाज उठवत आहोत. जर 140 कोटी भारतीय त्यांचे (पंतप्रधान नरेंद्र मोदींचे) कुटुंब आहे तर त्यांनी जनतेचा विश्वास का तोडला आणि त्यांच्यावर अन्याय का केला?" असा सवाल जयराम रमेश यांनी विचारला आहे. "गेली 10 वर्षे त्यांच्याच कुटुंबासाठी 'अन्यायाचा काळ' राहिला आहे. ते लोकशाही पद्धतीने निवडून आलेले व्यक्ती आहेत पण त्यांचे व्यक्तिमत्व आणि काम करण्याची पद्धत अन्यायकारक आहे. ते फक्त मार्केटिंग आणि रिब्रँडिंगसाठी (भाजपा आणि एनडीए सरकारच्या) बसलेले आहे. त्यांनी स्वतःला विश्वगुरू घोषित केलं आहे. आपण पंतप्रधान पदाचा आदर करतो पण एखाद्या व्यक्तीला सन्मान हवा असेल तर त्यांनीही आदराने वागले पाहिजे" असं म्हणत जयराम रमेश यांनी टीका केली आहे.


4 मार्च 2024 रोजी तेलंगणाच्या सभेत पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला एक कुटुंब म्हटलं होतं. नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानंतर काही वेळातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ते भाजपाचे प्रमुख जेपी नड्डा यांच्यासह पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील 'प्रोफाइल'मध्ये त्यांच्या नावांसोबत 'मोदी का परिवार' असं लिहिलं आहे. भाजपाच्या प्रचारालाही यातून सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील अदिलाबाद येथे जाहीर सभेला संबोधित करताना RJD प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार पलटवार केला. माझ्या कुटुंबामुळे मला लक्ष्य करण्यात आलं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पण, आता संपूर्ण देश म्हणतोय की मी मोदींचा परिवार आहे. घराणेशाही पक्षाचे चेहरे वेगवेगळे असू शकतात परंतु चारित्र्य एकच आहे. त्यांच्या चारित्र्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे खोटं बोलणं आणि दुसरं म्हणजे लुटणं असंही म्हटलं आहे.