Sangli Samachar

The Janshakti News

शेंगदाणे जास्त प्रमाणात खाल्ल्यास यकृत होते खराब ? आरोग्यतज्ज्ञ काय सांगतात ?



सांगली समाचार - दि. ९ मार्च २०२४
मुंबई  - शेंगदाणे खाण्यास तुमच्यापैकी अनेकांना आवडत असेल, यात शरीरास आवश्यक अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे हिवाळ्यात शेंगदाण्याचे अधिक प्रमाणात सेवन केले जाते. याशिवाय काही जण ऑफिस किंवा प्रवासादरम्यानही टाइमपास म्हणून शेंगदाणे खातात. पण, इतर कोणत्याही अन्नाप्रमाणेच शेंगदाण्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे तुमच्या यकृतासाठी हानिकारक असल्याचे मत आहारतज्ज्ञ पूजा पालरीवाला यांनी मांडले आहे. आहारतज्ज्ञ पालरीवाला यांनी इन्स्टाग्रामवर शेंगदाण्याचे अतिसेवन यकृतासाठी हानिकारक असल्याचे मत मांडले आहे.

आहारतज्ज्ञ पालरीवाला यांनी म्हटले की, शेंगदाणे जास्त प्रमाणात खाल्ल्याने अफलाटॉक्सिन हे एक विषारी रसायन तयार होते, ज्यामुळे यकृताला हानी पोहोचवू शकते; अशाने यकृताच्या कर्करोगाचाही धोका वाढतो. त्यामुळे शरीरात अफलाटॉक्सिनचे प्रमाण वाढू नये यासाठी शेंगदाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत शेंगदाण्याचे अधिक सेवन केल्यास त्याचा यकृतावर कसा परिणाम होतो याविषयी हैदराबादमधील यशोदा हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार फिजिशियन डॉ. दिलीप गुडे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. शेंगदाण्यात अनेक पौष्टिक घटक आहेत. यात प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिडंट जास्त प्रमाणात असते. यामुळे भूक कमी लागते. कॅलरीजचे प्रमाण भरपूर असल्याने वजन नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. 


प्रथिने, फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे खाण्याची अनावश्यक लालसा कमी होण्यास मदत होते. सर्वसाधारणपणे शेंगदाण्याचे सेवन आरोग्यदायी असते, कारण त्यात भरपूर आवश्यक अमिनो ॲसिड, जीवनसत्त्वे ई, रिबोफ्लेविन, बी9 आणि भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि फिनॉल असते. याशिवाय फायबर, मोनो आणि पॉली-अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडस्, ओमेगा -३ फॅटी ॲसिडस्, खनिजे आणि आवश्यक अमिनो ॲसिडस् असते. हे घटक यकृत निरोगी ठेवण्यास मदत करतात, NASH आणि NAFLD विरुद्ध लढण्यास मदत करतात आणि काहींना दीर्घकालीन यकृत रोग टाळण्यास मदत होते, असेही डॉ. दिलीप गुडे म्हणाले. शेंगदाणे योग्यरित्या साठवून न ठेवल्यास त्यात बुरशीचे प्रमाण वाढू शकते. अशाप्रकारचे शेंगदाणे खाल्ल्यास
यकृताचे नुकसान करण्यास कारणीभूत असलेल्या अफलाटॉक्सिनचे प्रमाण वाढू शकते.

डॉ. गुडे म्हणाले की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)- लखनौनुसार , भारतातील २१ टक्के शेंगदाण्यामध्ये अफलाटॉक्सिन असू शकते आणि त्यामुळे ते मानवी वापरासाठी योग्य नाही. ICRISAT ने असेही सुचवले आहे की, भारतीय शेंगदाण्यामध्ये अफलाटॉक्सिनची पातळी मर्यादेपेक्षा ४० पट अधिक आहे. डॉ. गुडे पुढे म्हणाले की, नॉन ब्रँडेड किंवा सैल, पॅकेज न केलेले शेंगदाणे खरेदी करणेही टाळले पाहिजे. याशिवाय अफलाटॉक्सिनच्या संपर्कात येण्यापासून टाळण्यासाठी रंगीत, आणि विविध प्रक्रिया केलेले शेंगदाणे खाणे टाळले पाहिजे. अशाने तुम्ही यकृताचे आरोग्य निरोगी ठेवू शकता. तुम्ही शेंगदाणे भाजून किंवा उकळून खाल्ल्लास त्यातील अफलाटॉक्सिनचे प्रमाण ९५ टक्के कमी होते, असेही डॉ. गुडे म्हणाले.