सांगली समाचार - दि. ९ मार्च २०२४
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत, शिवसेनेची (उबाठा) ताकद कमी आहे. तरी देखील ते जागा का मागतात हे कळत नाही. पण ही जागा काँग्रेसची आहे. ती मिळणार आहे. जागा वाटपात पक्षाने ही जागा जर शिवसेनेला सोडली तर 2009 मध्ये जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विसर्जित करुन जो पॅटर्न राबविला होता. तोच पॅटर्न सांगली लोकसभेला राबवून जिल्ह्यातील काँग्रेस विसर्जित करण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सांगली जिल्हा काँग्रेसच्या नूतन पदाधिकार्यांची निवड येथील काँग्रेस भवनमध्ये पार पडल्या. यावेळी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक देखील झाली. या बैठकीनंतर आ. विक्रमसिंह सावंत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सांगली लोकसभेच्या जागेवरून अनेक चर्चा सुरू आहेत. पण या चर्चात तथ्य नाही. सांगली लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाचीच आहे. काँग्रेसकडून विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. या निवडणुकीत विशाल पाटील निवडून येतील आणि शंभर टक्के खासदार होतील, यात काही शंका नाही. मुंबईत नुकतीच बैठक झाली.
शिवसेनेने (उबाठा) सांगलीची जागा मागितली असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले, पण ही जागा देण्यास नकार दिला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत. या उलट शिवसेनेची ताकद कमी आहे. आयात करून घेतलेले उमेदवार या मतदारसंघात लोक स्वीकारणार नसल्याचे आमदार सावंत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसच्या हात चिन्हावरच विशाल पाटील निवडणूक लढतील, आणि ते निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात जर ही जागा शिवसेनेला (उबाठा) ला सोडली तर 2009 मध्ये जत विधानसभा मतदारसंघात जो पॅटर्न राबवला होता, तोच पॅटर्न काँग्रेस विसर्जित करून राबवू, असा इशारा देखील आमदार सावंत यांनी दिला.
काय आहे जत विधानसभा पॅटर्न...
2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती. या निवडणुकीत काँग्रेसने जत मतदारसंघावर दावा केला होता. पण आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीला सुटली. राष्ट्रवादीने माजी आमदार विलासराव जगताप यांना उमेदवारी दिली. पण नाराज झालेल्या काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी जत तालुक्यातील काँग्रेस विसर्जित केली, सर्वांनी राजीनामे दिले. त्यानंतर उघडपणे भाजपचे प्रकाश शेंडगे यांचा प्रचार केला. या निवडणुकीत आघाडीला धक्का बसला आणि भाजपचे प्रकाश शेंडगे 4 हजार 600 मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे सांगलीच्या राजकारणात जत विधानसभा पॅटर्नला वेगळे महत्व आहे.