Sangli Samachar

The Janshakti News

पृथ्वीराज चव्हाणांच्या पक्षनिष्ठेला अखेर हायकमांडकडून "न्याय"



सांगली समाचार - दि. २३ मार्च २०२४
मुंबई - काँग्रेसने महाराष्ट्राची लोकसभा निवडणुकीची प्रचारसूत्रे अखेर निष्ठावंत पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाती सोपवली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख नेमण्याचा प्रस्ताव स्वीकारण्याची माहिती काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या महत्वपूर्ण नेमणुकीमुळे ते पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले आहेत.

2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. ते पवारांचे नावडते होते म्हणून पवारांनी त्यांचे सरकार मुदत पूर्ण होण्याआधी पाडले आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून विधानसभेच्या निवडणुका होऊ दिल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हायकमांडने बाजूला करत आणले होते. मात्र, आता महाराष्ट्रात काँग्रेसला पूर्णपणे गळती लागून अशोक चव्हाण यांच्यासारखे माजी मुख्यमंत्री देखील पक्षाबाहेर गेल्यानंतर काँग्रेस हायकमांडने "ओल्ड गार्ड" असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर विश्वास टाकत त्यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसची प्रचारसूत्रे सोपविली आहेत.


पृथ्वीराज चव्हाण हे खरेतर केंद्रीय राजकारणात मुरलेले नेते. त्यांना सोनिया गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याआधी ते तब्बल 6 वर्षे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना केंद्र सरकारमधले बरेच बारकावे माहिती होते. महाराष्ट्रातल्या त्या वेळच्या इतर कोणत्याही बड्या केंद्रीय मंत्र्यापेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांनी ते खाते अधिक सक्षमतेने सांभाळले होते.

पण शरद पवारांचा महाराष्ट्रातला वाढता प्रभाव रोखण्यासाठी सोनिया गांधींनी त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आणि सोनिया गांधींना अपेक्षित असलेला "रिझल्ट" पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला होता. त्यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात सिंचनाचा अनुशेष केवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे, याचा सरकारी पातळीवर बोभाटा झाला होता. त्यावेळी जलसंचन विभाग राष्ट्रवादी काँग्रेसची मक्तेदारी होता. त्याचबरोबर राज्य सहकारी शिखर बँक घोटाळ्यातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे पृथ्वीराज चव्हाण यांच्याच कारकिर्दीत उजेडात आली आणि पहिल्यांदाच त्यांनी धाडसी निर्णय घेऊन राज्य सहकारी शिखर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्याच्यावर प्रशासक नेमला होता. पवारांच्या आर्थिक नाड्या पृथ्वीराज चव्हाण यांनी आवळल्या होत्या. त्यामुळेच पवारांनी संतप्त होऊन त्यांचे सरकार पाडले होते.

पण त्यानंतर काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांना केंद्रीय स्तरावर काम करू दिले नाही. त्यांच्या क्षमतेचा उपयोग नीट करून घेतला नाही. महाराष्ट्रात देखील अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पद देऊन काँग्रेस हायकमांडने वेगवेगळे प्रयोग करून पाहिले, पण त्यांना अपेक्षित यश आले नाही. कारण मोदी लाटच जोरावर राहिली.

अशोक चव्हाणही आता काँग्रेस सोडून गेले आहेत. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्याकडेच महाराष्ट्रातली प्रचारसूत्रे सोपवली आहेत.

सगळे खानदान काँग्रेसनिष्ठ

पृथ्वीराज चव्हाण हे त्यांच्या आई-वडिलांपासून मूळ काँग्रेसशी विशेषतः गांधी कुटुंबीयांशी निष्ठावंत राहिले आहेत. त्यांचे वडील आनंदराव चव्हाण हे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात संरक्षण उत्पादन राज्यमंत्री होते, तर त्यांची आई प्रेमलाकाकी चव्हाण या अखंड काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार होत्या. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांचा प्रभाव होता तरी त्याचा अतिरिक्त भार आनंदराव चव्हाण किंवा प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या नेतृत्वावर पडू शकला नाही. यशवंतराव चव्हाण यांनी 1977 नंतर इंदिरा गांधींपासून वेगळे होत महाराष्ट्रात "स्वबळ" अजमावले होते. त्यावेळी प्रेमलाकाकी चव्हाण यांनी इंदिरा गांधींची भक्कम साथ दिली होती. 1980 इंदिरा गांधींनी प्रचंड विजय मिळवल्यानंतर यशवंतरावांनी त्यांच्यासमोर राजकीय शरणागती पत्करली. पण त्यानंतर देखील महाराष्ट्रावरचा यशवंतरावांचा प्रभाव टिकून राहण्यापेक्षा तो अस्तंगत होत गेला. त्याउलट प्रेमलाकाकी चव्हाण महाराष्ट्रातल्या प्रभावी नेत्या म्हणूनच वावरल्या.

पृथ्वीराज चव्हाण हे देखील केंद्रीय राजकारणात अतिवरिष्ठ पदावर वावरले. ते पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते. त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान मंत्री होते आणि नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शरद पवारांशी यशस्वी राजकीय पंगा घेणाऱ्या निवडक नेत्यांमध्ये नेत्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होतो. आता तर त्यांच्याकडे काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील प्रचारसूत्रे सोपवली आहेत. मोदी लाटेत हे आव्हान ते कसे पेलतात, हे पाहणे महत्त्वाचे आहेच, पण त्याहीपेक्षा त्यांची पक्षनिष्ठा अधिक महत्त्वाची आहे.