सांगली समाचार - दि. १७ मार्च २०२४
मुंबई - लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि 'मविआ'च्या आघाडीचा निर्णय झालेला नाही. वंचितने 'मुद्द्यां'चा दिलेला प्रस्ताव आणि जागा वाटपावरून दोन्ही बाजूने विसंवाद वाढला आहे. वारंवार टीकास्त्र सोडतांना आघाडी करण्याचा पर्यायही दोन्हीकडून खुला ठेवण्यात आला. लोकसभेच्या गत चार निवडणुकांमध्ये याच प्रकारे काँग्रेससोबत चर्चा होऊन अंतिम क्षणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी झाली नव्हती. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता पुन्हा एकदा बळावली आहे.
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय धुराळा उडण्यास सुरुवात झाली. राज्यात लोकसभेच्या मैदानामध्ये महायुती व 'मविआ'मध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत आहेत. यामध्ये वंचित आघाडीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल. मतविभाजन टाळण्यासाठी 'मविआ'कडून वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वंचितही 'मविआ' सोबत जाण्यासाठी इच्छूक असल्याचे वारंवार जाहीर करते. मग घोडले अडले कुठे? हा खरा प्रश्न आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. आघाडी रखडण्याचा सर्वाधिक परिणाम अकोला मतदारसंघावर पडत आहे.
जातीय राजकारण व मतविभाजनावर निवडणुकीचे गणित असलेला अकोला लोकसभा मतदारसंघ संपूर्ण राज्यात वेगळा ठरतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर येथून सातत्याने निवडणूक लढत असल्याने राजकीय वर्तुळाचे अकोल्याकडे लक्ष लागून असते. त्यांच्या भूमिकेवर अकोल्यात समीकरण ठरते. मतविभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांची मोट बांधण्याची 'मविआ'ची रणनीती आहे. अॅड. आंबेडकर यांना आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न आहेत. यापूर्वी चार लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत अंतिम क्षणापर्यंत बोलणी झाल्यावर ती फिसकटली होती. त्यामुळे काँग्रेस व अॅड. आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. विविध प्रयोग करूनही ते स्वबळावर विजयी होऊ शकले नाहीत. आता वंचित बहुजन आघाडीच्या ॲड. आंबेडकरांनी राज्यभर मोठ्या सभा घेऊन 'मविआ' नेत्यांच्या चिंतेत भर टाकली. सोबतच राज्यातील विविध २७ मतदारसंघामध्ये वंचित आघाडीने लक्ष केंद्रीत केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चार मुद्द्यांचे पत्र वंचितने 'मविआ'ला देऊन किमान समान कार्यक्रमाचा आग्रह धरला. जागा वाटपावरून 'मविआ'मध्ये अंतर्गत वाद आहे. 'मविआ'च्या नेत्यांनी देऊ केलेल्या जागा पडणाऱ्या असल्याचे कारण पुढे करून वंचितकडून नाकारण्यात येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर वाद वाढला. दोन्ही बाजूने बोलणीचा चेंडू एकमेकांच्या कोर्टात टाकण्यात येतो. अद्यापपर्यंत तोडगा निघालेला नाही.
अकोल्यात अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली आहे. शेवटपर्यंत 'मविआ'सोबत जाण्याचे प्रयत्न राहतील, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. 'मविआ' आणि वंचितची आघाडी झाल्यास अकोल्याची जागा ॲड. प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली जाईल. मात्र, आघाडी न झाल्यास ऐनवेळी काँग्रेसला उमेदवार द्यावा लागेल. काँग्रेसकडे इच्छूकांची मोठी गर्दी आहे. राजकीय परिस्थिती व सामाजिक समीकरण बघता अकोल्याच्या परंपरेनुसार पुन्हा एकदा तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. 'मविआ' व वंचितमधील आघाडीच्या तिढ्यामुळे शेवटपर्यंत हा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीने आपसातील मतभेद दूर करून वंचितशी वाटाघाटी करावी. आम्हाला हव्या असलेल्या जागांची यादी 'मविआ'कडे दिली आहे. पडणाऱ्या जागा देऊन आघाडीत वंचितचे मते घेण्याचे धोरण 'मविआ'ने स्वीकारू नये. वंचितने दिलेल्या यादीवर 'मविआ'ने तत्काळ निर्णय घ्यावा. असे डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी यांनी म्हटले आहे.