सांगली समाचार - दि. २४ मार्च २०२४
लखनऊ - येथील नाचना कुठारा गावात भारतीय पुरातत्व विभागाकडून चालू असलेल्या उत्खननात आतापर्यंतचे सर्वांत जुने मंदिर आणि शिवलिंग सापडले आहे. हे शिवलिंग पहिल्या किंवा पाचव्या शतकातील असल्याचे मानले जाते. ४ मार्चपासून चालू असलेले हे उत्खनन चौमुखनाथ मंदिराच्या आजूबाजूच्या ढिगार्यांमध्ये केले जात आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या जबलपूर क्षेत्राचे पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. शिवकांत वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली मंदिर परिसराजवळील ८ पैकी २ ढिगार्यांभोवती खोदकाम चालू आहे. १५ दिवसांच्या उत्खननानंतर येथील पार्वती मंदिरापासून ३३ मीटर अंतरावर असलेल्या ढिगार्यातून शिवलिंग निघाले आहे. इतिहासकार त्याला गुप्त काळातील शिवलिंग म्हणत आहेत. शिवलिंग कशामुळे बनवले ?, याचा शोध चालू आहे. वाजपेयी यांच्या मते, उत्खननात पुढे आणखी काही ऐतिहासिक वस्तू सापडतील.
ज्या गावात हे शिवलिंग सापडले आहे, त्या गावाविषयी पुरातत्वशास्त्रज्ञांचे मत आहे की, हे ठिकाण गुप्त काळात एक समृद्ध व्यापारी केंद्र असावे. वाजपेयी यांच्या म्हणण्यानुसार, पुरातत्व विभागाचे पहिले महासंचालक जनरल अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी या गावात २ जुनी मंदिरे शोधून काढली होती. यासंबंधीचा एक अहवाल वर्ष १८८५ मध्ये प्रसिद्ध झाला होता, ज्यामध्ये पहिले पार्वती मंदिर आणि दुसरे चतुर्मुख शिव मंदिर यांचा उल्लेख करण्यात आला होता. तेव्हापासून या ठिकाणाचा विभागाच्या सूचीमध्ये ऐतिहासिक वारसा म्हणून समावेश करण्यात आला होता.
पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. नारायण व्यास यांनी सांगितले की, नाचणाचे पार्वती मंदिर हे प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर दुमजली आहे. त्यात मंडप आणि गर्भगृह आहे. त्याचे छप्पर सपाट आहे. यावरून असे दिसून येते की, तोपर्यंत मंदिरांच्या शिखरांचे बांधकाम चालू झाले नव्हते. गंगा आणि यमुना यांची प्रतिमा मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर कोरीवकाम करून कोरलेली आहे. मंदिरांवर काही पौराणिक कथांचे चित्रणही आढळते. त्यांच्यावर गुप्तकाळाचा प्रभाव आहे. मंदिर वास्तुकलेचा आरंभ गुहा मंदिरांपासून झाला. हिनयान बौद्ध परंपरेतील लेणी अजिंठा येथे ख्रिस्तपूर्व दुसर्या शतकात बांधण्यात आली.
डॉ. व्यास यांनी सांगितले की, विदिशाजवळील बेसनगरमध्ये एका जुन्या मंदिराच्या पायाचे अवशेष सापडले आहेत. हे बहुधा लाकडापासून बनवलेले असावे आणि ख्रिस्तपूर्व दुसर्या शतकातील असावे. येथे एक गरुड स्तंभ आहे, ज्याला स्थानिक लोक 'खम्म बाबा' म्हणतात.