yuva MAharashtra "संजय काकांच्या विरोधात नेमका पैलवान कोण?"; मविआच्या तिढ्यावरून पडळकरांचा टोला

"संजय काकांच्या विरोधात नेमका पैलवान कोण?"; मविआच्या तिढ्यावरून पडळकरांचा टोला



सांगली समाचार  - दि. २५ मार्च २०२४
सांगली - लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सांगली मतदार संघावरून कॉँग्रेस आणि ठाकरे गटात वाद सुरू आहेत. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीची खिल्ली उडवली आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आत एक, बाहेर एक असे काही नसतं, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

मिरजमध्ये भाजप अल्पसंख्याक कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव फारुख जमादार यांच्याकडून आयोजित इफ्तार पार्टीला पडळकर यांनी उपस्थित लावली होती. त्यानंतर पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा पडळकर म्हणाले, “आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आत एक, बाहेर एक असे काही नसतं. त्यामुळे भाजपचे उमेदवार खासदार संजय काकांच्या बरोबर आम्ही सगळे जोरात कामाला लागलेला आहोत. मात्र, अजून देखील भाजपचे उमेदवार संजयकाकाच्या विरोधात नेमका कोण पैलवान आहे हे निश्चित झाले नसल्याने अजून सगळे लोक संभ्रमात आहेत असे, आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. 


सांगली लोकसभेची उमेदवारी तिसऱ्यांदा खासदार संजय काका पाटील यांना मिळालेली आहे. आता उमेदवारी अर्ज भरणं या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या लोकसभेच्या निवडणूकीत रंग येईल. मात्र तरीही संजयकाकाच्या विरोधातला नेमका पैलवान कोण हे फायनल झाले नसल्याचे म्हणत पडळकरांनी महाविकास आघाडीला टोला लगावला.

“धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार धनगर समाजाच्या बाजूने आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाने आता वेगळी भूमिका कोणी घेण्याची आवश्यकता नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा टेक्निकल विषय बनला आहे. आरक्षणाबाबतचे सगळे विषय आम्ही दुरुस्त करू आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आम्ही मार्गी लावू,” असा विश्वास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, सांगलीत भाजपकडून खासदार संजय पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु यावेळी उमेदवारी देण्यासाठी त्यांना पक्षातूनच काही जणांचा विरोध होता. मात्र पक्षाने पुन्हा संजय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने जाहीर केलेल्या लोकसभेच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश होता. ज्यात संजय पाटील यांच्या नावाचा देखील समावेश होता.