सांगली समाचार - दि. ९ मार्च २०२४
कोल्हापूर, - गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कन्नड विरुद्ध मराठी भाषिक असा वाद उभा राहिला आहे. सीमाभागात आठ दिवसांपासून कानडी गुंडांच्या माध्यमातून कन्नड सक्तीचा अतिरेक केला जात आहे. पोलीस संरक्षणात कानडी गुंड कन्नड पाटी सक्ती करत आहेत. या प्रकरणावरुन महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक झाली असून कन्नड सक्तीला तीव्र विरोध केला आहे. यासोबतच महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनाही त्यांना आवाहन केलं आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीची खंत
व्यापारी आस्थापनावरील फलकाच्या कन्नड सक्ती विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आक्रमक पावित्र्यामुळे बेळगावमध्ये पुन्हा एकदा मराठी-कन्नड वाद पेटण्याची शक्यता आहे. यावेळी एकीकरण समितीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली होती, त्याचे पालन केले जात नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत कोणतीही सक्ती करू नये, असा सूचना केल्या होत्या. मात्र, पुन्हा कन्नड सक्तीचा वरवंटा आमच्या माथ्यावर फिरवला जात आहे. मात्र, महाराष्ट्रातला एकही नेता यावर बोलायला तयार नाही, अशी खंत समितीने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी..
सगळ्या नेत्यांकडे पाठपुरावा करत आहे. महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये याबाबत उदासीनता दिसून येत आहे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. सीमाभाग महाराष्ट्रातील नेत्यांना महाराष्ट्रामध्ये पाहिजे आहे की नाही हे स्पष्ट करावे. आम्हाला सीमा भागामध्ये राहण्याचा आता कंटाळा आला आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला अखेरची घरघर लागली आहे. आमची चळवळ गेल्या अनेक वर्षांपासून व्हेंटिलेटरवर आहे. आमच्या चळवळीचा जीव घ्यायचा की त्यामध्ये जीव फुंकायचा हे महाराष्ट्रातील नेत्यांनी ठरवायचं आहे. मुख्यमंत्र्यांनी या कन्नड सक्ती विरोधात अमित शहा यांची भेट घेतो असे आश्वासन दिले आहे, असंही त्यांनी सांगितले आहे.