सांगली समाचार - दि. ७ मार्च २०२४
नवी दिल्ली: भाजप नेते अमित शाह हे ५ मार्च महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जागा वाटपावर चर्चा झाली. यावेळी शिवसेनेला 10 आणि अजित पवारांना 6 जागा देण्यात येतील असं शाहांनी सांगितलंच सूत्रांकडून समजतं आहे. ज्यानंतर याबाबत बरीच चर्चा ही राज्यभरात सुरू झाली. या सगळ्याचे अनेक राजकीय अर्थही काढले जात आहे. कारण ज्या शिवसेनेसाठी भाजपने 2019 मध्ये 23 जागा सोडल्या होत्या त्याच शिवसेनेला केवळ 10 जागा देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरीच नाराजी असल्याची चर्चा आहे. मात्र, याच दरम्यान भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलं आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपच्या कोअर कमिटीला जागांबाबत चर्चा करण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये बोलावलं. दरम्यान, दिल्लीत पोहचताच देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील एक मोठं विधान केलं आहे.
दिल्लीत पोहचताच देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ?
लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्यादृष्टीने एकूण रणनिती काय असेल त्याचं टाइमटेबल काय असेल आम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे.. अशा सगळ्या गोष्टींसंदर्भात प्रत्येक राज्याच्या कोअर कमिटीशी केंद्रीय नेतृत्व चर्चा करत आहे. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राला देखील इथे बोलावलं आहे. आमच्याशी आता त्यांची चर्चा होईल.'
आपण पहिल्या यादीत पाहिलं असेल की, जिथे युती आहे त्या ठिकाणची नावं पहिल्या यादीत आली नाही. कारण युतीत जे पक्ष सोबत असतात त्यांच्यासोबत चर्चा करावी लागते. पहिल्या यादीत जिथे फक्त भाजप लढतो अशाच राज्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आता युतीत असलेली राज्यं येतील.. तुम्ही काळजी करू नका.. तुम्हाला योग्य वेळी सगळ्या प्रकारचे आमचे जे काही निर्णय होतील ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहचवू.
खरं म्हणजे ही पतंगबाजी आहे की, आमच्या मित्रपक्षांना एक डिजिट, अर्धे डिजिट जागा मिळणार आणि एवढेच मिळणार.. मला असं वाटतं की, अशाप्रकारे पतंगबाजी करणं हे अयोग्य आहे. आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ. त्यामुळे हे जे काही मीडियाच स्वत:हून जे ठरवतंय. की, एवढ्याच जागा मिळणार, तेवढ्याच जागा मिळणार.. हे मीडियाने बंद केलं पाहिजे.. हे अतिशय चुकीचं आहे.. ही धादांत चुकीची बातमी आहे.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपामध्ये शिंदे-पवारांना योग्य जागा मिळतील असं म्हटलं आहे.