सांगली समाचार - दि. १८ मार्च २०२४
नवी दिल्ली - भारतीय निवडणूक आयोगाने आज रविवारी निवडणूक रोख्यांसंबंधी अतिरिक्त डेटा अपलोड केला, यात रिडीम केलेल्या रकमेवरील पक्षनिहाय तपशील तसेच बँक खात्याच्या माहितीचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमधून ही माहिती नुकतीच डिजीटल स्वरूपात निवडणूक आयोगाला प्राप्त झाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आज त्यांच्या वेबसाइटवर निवडणूक रोख्यासंबंधी नवीन माहिती प्रकाशित केली आहे. त्यात कोणकोणत्या पक्षांना देणग्या दिल्या याचा तपशील असतो. यावरून इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्सनेही एका पक्षाला कोट्यवधींची देणगी दिल्याचे उघड झाले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर आज प्रकाशित करण्यात आलेल्या तपशीलात पक्षांना देणग्या देणाऱ्या संस्थांची नावे आहेत. त्यानुसार CSK संघ व्यवस्थापनाने AIADMK ला ५ कोटी रुपयांची देणगी दिल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच १२ आणि १५ एप्रिल २०१९ रोजी निवडणूक रोख्यांद्वारे AIADMK च्या बँक खात्यात एकूण ६.०५ कोटी रुपये दान करण्यात आले. एकूण ३८ निवडणूक रोख्यांद्वारे या देणग्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये CSK चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापनाने ३२ निवडणूक रोखे जारी केले आहेत. चेन्नई सुपर किंग्जच्या वतीने केवळ ५ कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे. त्यापैकी २ निवडणूक रोखे प्रत्येकी १ कोटी रुपयांचे आहेत. इतर ३० निवडणूक रोख्यांची किंमत प्रत्येकी १० लाख रुपये आहे. विशेष म्हणजे फ्रँचायझी मालक इंडिया सिमेंटनेही द्रमुकला १० कोटी रुपयांची देणगी दिली आहे.