yuva MAharashtra संजय काकांच्याविरोधात पहिली ठिणगी स्व पक्षातूनच

संजय काकांच्याविरोधात पहिली ठिणगी स्व पक्षातूनच



सांगली समाचार - दि. १६ मार्च २०२४
सांगली - भाजपने सांगली लोकसभा मतदारसंघात पुन्हा खासदार संजय पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होताच पक्षातूनच संजयकाका पाटलांविरोधात रान पेटले आहे. मतदारसंघावर पाटलांची उमेदवारी लादल्याची टीका माजी आमदार, भाजप नेते विलास जगतापांनी केली आहे. त्यामुळे सांगलीतून भाजप उमेदवार संजयकाका पाटलांना खासदारकीची हॅटट्रिक करण्यासाठी पक्षांतर्गत अडथळ्यांची शर्यत पार करावी लागण्याची शक्यता आहे.

विलास जगताप म्हणाले, सर्व्हे, पक्ष निरीक्षकांचा अहवाल नकारात्मक, अनेक नेत्यांच्या विरोध असतानाही पुन्हा खासदार संजयकाका पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पक्षात अनेक नेते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर विशषत: दुष्काळी पट्ट्यातील नेत्यांची लवकरच बैठक होणार आहे. यात पुढील निर्णय घेण्यात येईल.


खासदार पाटील यांना आमचा विरोध असणार आहे. कोणाला पाठींबा द्यायचा हे त्या बैठकीत ठरणार आहे. विरोधकांचा उमेदवार ठरला की ही बैठक होणार असल्याचे जगतापांनी सांगितले. पाटील यांनी रांजणी ड्रायपोर्ट, कवलापूर विमानतळ यासह मतदारसंघाच्या अन्य भागात गेल्या दहा वर्षांत कामे केली नाहीत, असा आरोपही जगतापांनी केला.

विक्रम सावंतांना संजयकाकांची मदत

माजी आमदार जगताप म्हणाले, संजयकाकांवर माझा व्यक्तिगत रोष नाही. पण त्यांचा इतिहास गद्दारीचा आहे. पक्षात राहून अन्य पक्षातील लोकांनाच त्यांनी नेहमी मदत केली. 2014 मध्ये मी त्यांच्या सोबत दिल्ली, नागपूर दौरे करत त्यांना साथ दिली, निवडून आणले. 2019 मध्येही मीच पुढाकार घेवून अन्य नेत्यांची नाराजी दूर करीत विजय सुकर केला. पण त्यांनी काय केले? जतमध्ये सतत माझ्या विरोधात काड्या केल्या. विधानसभेला त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंतांना साथ देत माझा पराभव केला. असे असेल तर आम्ही त्यांचा प्रचार का करायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जगतापांनी वाचला संजय पाटलांच्या गद्दारीचा पाढा

विलासराव जगताप यांनी खासदार संजयकाकांच्या गद्दारीचा पाढा वाचला. जिल्हा परिषदेत दोन्ही वेळी पदाधिकारी बदलात पाटील यांनी पक्षाशी गद्दारी करत अपक्षाला सभापती केले. त्याच अपक्षाला जिल्हा नियोजन समितीवर पाठविले. सांगली महानगरपालिकेच्या महापौर निवडीत त्यांनी गद्दारी करीत भाजपच्या उमेदवाराला पाडले. सांगली बाजार समितीच्या निवडणुकीतही सेटलमेंट करुन भाजपचे पॅनेल पाडले.