सांगली समाचार - दि. १७ मार्च २०२४
जालना - राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच, अनेक राजकीय घडामोडींना वेग येतांना पाहायला मिळत आहे. अशात भाजप नेते अशोक चव्हाण यांनी शनिवारी मध्यरात्री अचानक आंतरवालीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बैठक देखील झाली. विशेष म्हणजे रात्री 11.30 वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्री 1.30 वाजता संपली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली.
भाजप नेते अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे यांच्यात शनिवारी रात्री आंतरवाली सराटीमध्ये दीड तास चर्चा झाली. रात्री साडेकरा वाजता अचानक अशोक चव्हाण हे आंतरवालीमध्ये दाखल झाले. यावेळी आंदोलनस्थळा शेजारी असलेल्या एका घरात दोघांमध्ये चर्चा झाली. मनोज जरांगे यांनी सरकारकडून दबाव आणून आंदोलकांवर विनाकारण गुन्हे दाखल होत असल्याची कैफियत चव्हाणांसमोर मांडली. सरकारकडून सगेसोयरेबाबत फसवणूक झाल्याचं देखील जरांगे यांनी म्हटलंय. दरम्यान जरांगेंच्या मागणीबाबत चर्चा करून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे या भावनेने आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण आल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
हलगी वाजवणाऱ्या लोकांवर देखील गुन्हे दाखल
मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्यात तब्बल दीड तास चर्चा सुरू होती. मनोज जरांगे यांनी सरकारकडून आंदोलकांवर दबाव आणून विनाकारण गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप अशोक चव्हाणांसमोर केला. अनेकांना पोलीस प्रशासन विनाकारण चौकशीसाठी बोलवत असल्याचं देखील जरांगे यांनी अशोक चव्हाण यांना सांगितले. तसेच, सरकारकडून बॅनर लावणारे, हलगी वाजवणाऱ्या लोकांवर देखील गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला.
पुढच्या आंदोलनाची दिशा 24 तारखेला ठरणार : जरांगे
दरम्यान या भेटीवर बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, सरकारने फसवणूक केल्याचे आपण अशोकराव चव्हाण यांना सांगितले आहे. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचं देखील सांगितले. गुन्हे मागे घ्यायचे ठरलं असतांना उलट अधिक गुन्हे दाखल केले जात आहेत. मागणीप्रमाणे हैदराबादचे गॅझेट्स घेतले नाही, यासह समाजाच्या मागण्या, प्रश्न, शासनाकडून होणारी फसवणूक याबाबत अशोक चव्हाण यांच्यासोमर मांडली आहे. आता ते त्यांच्या परीने प्रयत्न करतील. मात्र, आम्ही 24 मार्च रोजी मराठा समाजाची बैठक बोलाविली आहे. त्यात मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.