yuva MAharashtra चिपको आंदोलनाची पन्नाशी

चिपको आंदोलनाची पन्नाशी



सांगली समाचार - दि. २६ मार्च २०२४
डेहराडून - 'चिपको' हा हिंदी भाषेतला शब्द. चिपकने किंवा लिपटने ह्या हिंदी शब्दापासून 'चिपको' हा शब्द बनलेला आहे. झाडांना मिठी मारून त्यांना कापण्यास विरोध करण्याच्या कृतीला 'चिपको' असे नाव देण्यात आले. झाडांचे रक्षण करण्यासाठी ही कृती लोकांनी सहजतेने स्वीकारली आणि तिला मान्यता मिळून लोकप्रिय झाली. याची परिणामकारकता दिसून आल्याने हे आंदोलन 'चिपको आंदोलन' नावाने प्रसिद्ध झाले. झाडांना मिठी मारून आपल्या प्राणाचे बलिदान देण्याची घटना सप्टेंबर १७३० मध्येही जोधपूर जिल्ह्यातल्या खेतडी नावाच्या गावात घडल्याचे सांगितले जाते.

कायदे अथवा प्रतिबंधात्मक उपाय करून जंगलांचे संरक्षण आणि संवर्धन करता येणार नाही, हा विचार चिपको आंदोलनाने समाजात दृढ केला. वन व्यस्थापनविषयक सदोष धोरणामुळे जंगलांचा र्‍हास होत आहे. खेड्यात राहणार्‍या जनतेच्या दैनंदिन गरजांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. एकीकडे शासकीय संरक्षणात वन्य पदार्थांची विक्री महागड्या किमतीत सुरू आहे, तर दुसरीकडे जंगलात राहणार्‍या लोकांना सरपण, इमारती लाकूड, गुरांसाठी चारा यापासून वंचित राहावे लागते.


यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे शासकीय धोरण. पर्यावरण संरक्षणाशी निगडित विविध आंदोलनांमध्ये स्त्रियांनी आपली सक्रिय भूमिका पार पाडली आहे. इतिहासात डोकावल्यास असे लक्षात येते की प्राचीन काळात पर्यावरण संरक्षण करण्यासाठीच्या प्रयत्नांची सुरुवात स्त्रियांनीच केली आहे. १८व्या शतकाप्रारंभी जोधपूरच्या राजाच्या कर्मचार्‍यांनी झाडे कापण्यास सुरुवात केली. अनिता देवी नामक स्त्रीने आपल्या प्राणाची आहुती देऊन झाडांचे संरक्षण केल्याचा प्रेरणादायी इतिहास आहे.

चिपको आंदोलनाची खळबळ माजवणारी घटना मार्च १९७४ मध्ये उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातल्या रैणी गावात घडली. गावातल्या पुरुषांच्या गैरहजेरीत गौरादेवी नामक महिलेच्या नेतृत्वाखाली चिपको पद्धतीने इथल्या महिलांनी रैणी गावाच्या जंगलाचा नाश होऊ दिला नाही. २६ मार्च १९७४ या दिवशी जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात रैणी गावातले सर्व पुरुष मंडळी जिल्ह्याच्या मुख्यालयात गेले होते. गावात फक्त महिला आणि मुलेच होती. त्या दिवशी वन विभागाच्या कर्मचार्‍यांची एक तुकडी झाडे कापायला या ठिकाणी आली होती, मात्र त्यांचा हा प्रयत्न गौरादेवी आणि तिच्यासोबतच्या २७ साहसी स्त्रियांनी हाणून पाडला.

त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे ह्या गावाच्या जंगलातल्या तब्बल २४५१ झाडांना वाचवण्यात यश आले. चिपको आंदोलनाने ग्रामीण स्त्रियांमध्ये पर्यावरण संरक्षणाविषयी जाणीव-जागृती निर्माण केली. इतकेच नाही तर या स्त्रियांनी व्यवस्थेमध्ये सहभागी होऊन आपले नेतृत्वगुणही विकसित केले. आता वन पंचायतींवर स्त्रियांचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. जंगल वाचवण्यासाठी स्वयंप्रेरणेने स्त्रिया पुढे येऊन नेतृत्व करताना दिसत आहेत. शिवाय राजकारण आणि सत्तेवरही स्त्रिया लक्ष ठेवून असल्याचे आढळते.

आर्थिक स्वावलंबनासाठी जंगलांचा व्यापारी उपयोग बंद करणे, नैसर्गिक समतोल साधण्यासाठी वृक्षारोपणाचे अभियान गतिमान करणे, ही चिपको आंदोलनाची प्रमुख उद्दिष्टे सांगता येतात. सुरुवातीला तत्कालीन आर्थिक फायद्याला विरोध करणारे चिपको आंदोलन एक सामान्य आंदोलन होते, तथापि कालांतराने हे पर्यावरण संरक्षण आणि स्थिर अर्थव्यवस्थेचे एक अभिनव आंदोलन बनले. या आंदोलनापूर्वी जंगलांना केवळ व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे समजले जायचे.

व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जायची. जंगलांचे पर्यावरणाच्या दृष्टीने असेलेले महत्त्व चिपको आंदोलनाच्या निमित्ताने सर्वसामान्यांच्या लक्षात यायला लागले. जंगलांची पर्यावरणीय संपत्ती म्हणजे इंधन, चारा, खत, फळे अशी या आंदोलनाची धारणा होय. याशिवाय माती आणि पाणीदेखील दोन महत्त्वाच्या पर्यावरणीय संपत्ती असून मानवाच्या जगण्याचे मूलाधार आहेत.

जंगलांचे संरक्षण करण्यासाठी लोकशिक्षणाची भूमिका महत्त्वाची आहे. यामुळेच अधिक व्यापक स्तरावर लोकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव-जागृती करता येईल हे अधोरेखित करण्यात या आंदोलनाला यश मिळाले. कोणतेही आंदोलन यशस्वी होण्यासाठी लोकांचा सहभाग अत्यंत गरजेचा असतो. लोकसहभाग नसेल तर आंदोलन अथवा चळवळ यशस्वी होत नाही. तद्वतच लोकांच्या सहभागाशिवाय जंगलांच्या संरक्षणाची कल्पना करणे व्यर्थ आहे.

अशा प्रकारे चिपको आंदोलनात झाडांचे रक्षण करण्याचा प्रभावी मार्ग, जंगलातील साधन-संपत्तीचा वैज्ञानिक पद्धतीने वापर, समग्र संरक्षण आणि वृक्षारोपण यांसारखी कार्ये करण्यात आली. हे आंदोलन म्हणजे केवळ झाडांना मिठी मारून त्यांना वाचवणारे आंदोलन नसून जंगलांच्या अवस्थेबाबत जाणीव-जागृती निर्माण करणारे, संपूर्ण वन व्यस्थापनाला निश्चित रूप देणारे आणि जंगल व जंगलात राहणार्‍या आदिवासींच्या समृद्धीसमवेतच धरणीमातेच्या समृद्धीचे आंदोलन बनले.

पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने चिपको आंदोलनाने राबवलेले विविध उपक्रम लक्षणीय आहेत. झाडे कापायला विरोध, या लहानशा विचाराने सुरू झालेल्या या आंदोलनाने अनेक परिवर्तने घडवून आणली. जंगलांचे महत्त्व, जंगलांचा यथोचित विनियोग, जंगल आणि लोकांचा परस्पर संबंध, निसर्ग व पर्यावरण संरक्षण यांसारख्या मुद्यांना स्पर्श करून तो प्रवाह सतत प्रवाही ठेवण्याचे श्रेय या आंदोलनाला दिले जाते. हे आंदोलन आताशा आंदोलन कमी आणि स्वयंप्रेरित अभियान झालेले दिसत आहे. यातून लढण्याचा नाही तर शिकण्याचा धडा लोकांना मिळत आहे.

जंगलांसोबत आपले घनिष्ठ नाते असल्याचा संदेश चिपको आंदोलनाने दिला आहे. जंगले आपल्या वर्तमानाचे आणि भविष्याचे रक्षणकर्ते आहेत. जर जंगलांचे अस्तित्व राहिले नाही तर सजीव सृष्टीचे अस्तित्व नष्ट होईल. आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करण्याचा मानवाला अधिकार आहे, पण हा उपयोग इतक्या निर्दयतेने करू नये की ज्यामुळे नैसर्गिक समतोल बिघडेल. या आंदोलनाने संपूर्ण देशाला हा अत्यंत मौलिक संदेश दिला. ही विचारधारा लोकांनी स्वीकारली तर आपले पर्यावरणीय गतवैभव पुन्हा प्राप्त करता येईल.

जंगलविरहीत भूमी पुन्हा हिरवाईच्या साजाने बहरून येईल. या आंदोलनापासून इतर देशातल्या लोकांनीही प्रेरणा घेऊन पर्यावरण संरक्षणाची चळवळ सुरू केली. चिपको आंदोलनाचे कर्ते गौरादेवी, चांदीप्रसाद भट, सुंदरलाल बहुगुणा व लक्ष्मी आश्रमच्या सरलाताई यांच्या अलौकिक कार्य आणि योगदानाला मनापासून सलाम! येणार्‍या पिढीला राहण्या-जगण्यासाठी योग्य आणि हिरवीगार जमीन, स्वच्छ हवा, शुद्ध पाणी यांच्या पूर्ततेसाठी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धन करणे अनिवार्य नि अपरिहार्य झाले आहे, अन्यथा परिस्थिती बिकट होईल.