सांगली समाचार - दि. ६ मार्च २०२४
मुंबई - महाविकास आघाडीतही जागा वाटपाबाबतच्या चर्चानी वेग धरला असून आता मुंबईत मंगळवारपासून सुरू झालेली विविध पातळीवरील चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांना बुधवारी भेटण्याचा निरोप दिला असून वंचितच्या महाविकास आघाडीतील प्रवेशावर बुधवारीच शिक्कामोर्तब होऊ शकते.
जागावाटपाचा वाद अधिक चिघळू नये यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी 'सिल्व्हर ओक'वर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दीड तास चाललेल्या या बैठकीत काही मतदारसंघांसाठी अडलेले जागावाटप आणि वंचितच्या भूमिकेसंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. वंचितला सोबत घेण्याबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघेही आग्रही असल्याने नेमक्या किती जागा त्यांना सोडता येतील, याची चाचपणी 'सिल्व्हर ओक'वरील बैठकीत करण्यात आली. सर्व ४८ जागांचे वाटप लवकरात लवकर करणे आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचारसभांचे नियोजन यावर विस्तृत चर्चा या बैठकीत झाल्याचे समजते. उद्या, बुधवारी महाविकास आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीत जागावाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (शपा) शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिवसेना (उबाठा) चे उध्दव ठाकरे आणि वंचित बहुजन विकास आघाड़ीचे प्रकाश आंबेडकर हे सहभागी होतील. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये, निर्माण झालेला तिढा सोडवण्याचा प्रयत्न या बैठकीत होईल. त्यासोबतच वंचित बद्दलचेही चित्र स्पष्ट होणे अपेक्षित आहे.
राजू शेट्टी, महादेव जानकरांना सोबत घेण्याबाबत चाचपणी सुरू असून वंचितला सहा ते आठ जागा देण्याचा विचार महाविकास आघाडीत सुरु आहे. काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून प्रत्येकी दोन जागा सोडाव्यात. याशिवाय इतर छोट्या घटकपक्षांना सामावून घ्यायचे झाल्यास संबंधित पक्षांनी त्यांना सामावून घ्यावे असेही सूत्र ठरविले जाणार आहे. शरद पवार गट वंचितला दोन जागा सोडण्यासोबतच राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांना सोबत घेण्याची चाचपणी करत आहे.