Sangli Samachar

The Janshakti News

राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू होणार



सांगली समाचार - दि. १६ मार्च २०२४
मुंबई - राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता राज्यातील प्रत्येक शाळेत ड्रेस कोड लागू होणार आहे त्यामुळे शाळेत शिक्षकांना टी-शर्ट किंवा जीन्स पॅन्ट अथवा इतर कुठल्याही प्रकारचा भडक ड्रेस परिधान करता येणार नाही. सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील पुरुष व महिला शिक्षकांना शाळा निश्चित करेल अशा रंगाचा ड्रेस कोडचे पालन करणे बंधनकारक असेल. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 

शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू झाल्यावर नेमकं काय होणार ?

ड्रेस कोड लागू झाल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या मनाप्रमाणे कोणतेही कपडे घालता येणार नाहीत. शाळेतील सर्व शिक्षकांना व्यवस्थापनाने निश्चित केलेले कपडे परिधान करावे लागतील. महिला शिक्षकांना साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता दुपट्टा, असा प्रयोग करावा लागेल. तर पुरुष शिक्षकांना शर्ट, ट्राउजर, पॅन्ट घालावे लागेल. शर्ट इन असावा तसेच भडक रंगाचे वा चित्र विचित्र नक्षीकाम किंवा चित्रे असलेले पेहराव घालू नयेत तसेच शिक्षकांनी जीन्स टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करू नये. या मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.


शिक्षकांचा स्टेटस वाढणार 

एकीकडे राज्य सरकारने शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू केला असेल तर दुसऱ्या बाजूला त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने घेतलेल्या आणखी एका निर्णयामुळे शिक्षकी पेशा आता स्टेटस सिम्बॉल होणार आहे शिक्षकांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान असल्याने शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत 'टी आर' असे संबोधन लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर यांच्या नावाच्या आधी डॉ. किंवा वकील त्यांच्या नावाच्या आधी ॲड. असे संबोधन करतात, त्याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकांच्या वाहनावर देखील हे संबोधन व त्या अनुरूप बोधचिन्ह देखील लावण्याची परवानगी देण्यात आल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.