सांगली समाचार - दि. १७ मार्च २०२४
मुंबई - अर्धवट आणि न्यायालयात टिकेल की नाही याची खात्री नसलेले आरक्षण दिल्याने महाराष्ट्रात २८ टक्के असलेला मराठा समाज नाराजच नाही, तर संतप्तही आहे. त्याचे तीव्र पडसाद होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत उमटण्याची दाट शक्यता आहे. कारण आरक्षण आंदोलनातून कधी नाही, तो विविध पक्षांत विखुरलेला मराठा समाज आता एकवटला आहे. तो मतांतही तसा एक होतो का हे आता दिसणार आहे.
ओबीसींनंतर मराठा मते महाराष्ट्रात निर्णायक आहेत. त्या एकगठ्ठा मतांत राज्यातील सत्तेचा तराजू झुकविण्याची ताकद आहे. पण,आतापर्यंत विविध पक्षात ती विखुरली जात असल्याने त्याची पॉवर दिसत नव्हती. प्रत्येक राजकीय पक्ष या मतांचा फक्त गैरफायदाच घेत आला असल्याचे या समाजाला आरक्षण आंदोलनानंतर लक्षात आले आहे. त्यातून त्यांना आपली शक्ती कळली. ती दाखवून देण्याची संधीही त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रुपाने लगेच चालूनही आली आहे. तिचा लाभ ते कसा घेतात हे जूनमध्ये कळेलच.
महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण दिलं, तरी ते लगेच न्यायालयाच्या कात्रीत सापडले आहे. ओबीसीतून ते देण्याची त्यासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil)यांची मुख्य मागणी मान्य झाली नाही. कुणबी प्रमाणपत्र सगेसोयऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. परिणामी राज्य सरकारविरुद्ध मराठा समाजात मोठी नाराजी आहे. त्याचा फटका केंद्र तसेच राज्यातील सत्ताधारी युतीतील तिन्ही पक्षांना बसेल असा अंदाज आहे. कारण आरक्षण दिल्याचा प्रचाराचा मुद्दा त्यांना करता येणार नाही. कारण असे दिलेले आरक्षण यापूर्वी दोनदा रद्द झाल्याचे मराठा समाज विसरलेला नाही. घटनेने घालून दिलेल्या आरक्षणाचा टक्का वाढवून केंद्र सरकारनेही ते आपल्या अधिकरात दिलेले नाही.
मोदी की मराठा आरक्षण लाट
२०१४ च नाही,तर २१०९ ची ही लोकसभा मोदी लाटेमुळे भाजप देशात जिंकली. त्यावरच त्यांचा २०२४ ला सुद्धा भरवसा आहे. पण,यावेळी महाराष्ट्रात मराठा आरक्षण कार्ड हा सुद्धा मोदींएवढा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. कारण तो राज्याच्या २८ टक्के लोकसंख्येशी निगडीत आहे. ही एकगठ्ठा मते विरोधी पक्षांच्या पारड्यात गेली असती, तर चित्र वेगळे दिसले असते. पण, मराठा समाजानेच आपले उमेदवार उभे करण्याचे ठरविल्याने त्यांची बहूतांश मते त्यांना मिळतील. पण, इतर त्यातही आऱक्षणाला धक्का न लागलेल्या ओबीसी मतांच्या आधारे सत्ताधारी पुन्हा बाजी मारण्याची शक्यता आहे. शिवाय हिंदू कार्ड त्याजोडीला मोदी करिष्मा आणि अयोध्येतील श्रीरामाचा भावनिक मुद्दाही भाजपकडे आहे.
जरांगेंचा ठाकरे होणार का ?
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या लाखोंच्या सभा होत.पण,मतांत त्यांचे परिवर्तन होत नसे. ही खंत त्यांनी स्वत:ही अनेकदा बोलून दाखवली होती. आता त्यांचे पुतणे राज ठाकरे यांच्या बाबतीत होत आहे.त्यांच्याही वक्तृत्वाचे लाखो फॅन आहेत. त्यांच्या सभेलाही जनसागर लोटतो. पण,त्यांच्या मनसेला मते, मात्र तेवढी मिळत नाहीत.हे मनोज जरांगेच्याही बाबतीत होणार का याकडे आता लक्ष लागले आहे. ठाकरेंप्रमाणे जरांगेंच्याही एक नाही,तर अनेक सभा त्याही लाखोंच्या मराठा आरक्षणासाठी झाल्या आहेत.पण,त्या गर्दीचे मतांत रुपांतर होणार की त्या सुद्धा ठाकरेंच्या सभेसारख्या मतांच्या बाबतीत फ्लॉप ठरणार हे लोकसभा निवडणुकीत दिसले असते. पण,त्यांनी आपले उमेदवार देण्याचे ठरविल्याने त्याचा फटका सत्ताधारींना बसणार नाही. तसेच त्याचा फायदा विरोधकांनही होणार नाही. फक्त त्यांची एकूण मते आणि लीड कमी होईल. फक्त मराठा मतांवर मराठा जरांगेंचा म्हणजे मराठा समाजाचाा अपक्ष उमेदवार विजयी होणे अवघड दिसत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाची अधिक तीव्रता असलेल्या मराठवाड्यात,मात्र ते दोन नंबरची मते घेऊ शकतात.