yuva MAharashtra महाराष्ट्रातील 'हा' रेल्वे मार्ग अजूनही ब्रिटिशांच्या ताब्यात, भारताला द्यावी लागते रॉयल्टी

महाराष्ट्रातील 'हा' रेल्वे मार्ग अजूनही ब्रिटिशांच्या ताब्यात, भारताला द्यावी लागते रॉयल्टी



सांगली समाचार - दि. २४ मार्च २०२४
यवतमाळ - भारत स्वातंत्र्य होऊन कित्येक वर्ष लोटली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाने खूप प्रगतीही केली आहे. भारतीय रेल्वेचे जाळे देशभरात पसरलेले आहे. तर जगातील चौथे सर्वात मोठे रेल नेटवर्क आहे. लवकरच भारतात बुलेट ट्रेन सुरू होत आहे. तर, वंदे भारतच्या सेवादेखील देशात सुरू झाल्या आहेत. भारतीय रेल्वे हा देशातील सर्वात मोठा विभाग आहे. पण तुम्हाला माहितीये का भारतात एक असा रेल्वे ट्रॅक आहे त्यावर इंग्रजांची मालकी आहे. तर हे खरं आहे. महाराष्ट्रात एक असा रेल्वे रूळ आहे त्याचे अधिकार सरकारकडे नसून ब्रिटनच्या एका खासगी कंपनीकडे आहे. 

1952 मध्ये भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. पण देशातील हा रेल्वे मार्ग मात्र सरकारच्या अखत्यारित नसून ब्रिटिश कंपनीच्या ताब्यात आहे. आजही ब्रिटनच्या क्लिक निक्सन अँड कंपनीच्या भारतीय युनिट सेंट्रल प्रोव्हिन्सेस रेल्वे कंपनीला या रेल्वे ट्रॅकसाठी करोडो रुपयांची रॉयल्टी द्यावी लागते. शंकुतला एक्स्प्रेस या नावाने याला ओळखले जाते. महाराष्ट्रातील यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूर या मार्गावर धीम्या गतीने चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी. सुरुवातीला ही रेल्वे वाफेच्या इंजिनवर चालत होती. 6 डबे असलेली ही शकुंतला एक्स्प्रेस 190 किमी मार्गावर धावत होती. ही गाडी सध्या बंध आहे. मात्र, कमी भाडे असल्याने गरिबांना ही गाडी परवडत होती. मात्र या गाडीचा वेग अत्यंत कमी असल्याने यवचमाळ ते मूर्तिजापूर हे 114 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सहा ते सात तास लागायचे. 


या रेल्वे मार्गावरील सिग्नलदेखील ब्रिटिशकालीन असून यावर मेड इन लिव्हरपूल असा उल्लेख आढळतो. गाडीचे वाफेचे इंजिनही मँचेस्टर येथे बनवले होते. 1923 पासून सलग 70 वर्षे ते सेवेत होते. त्यानंतर 1994 पर्यंत ही गाडी वाफेच्या इंजिनावर धावत होती. त्यानंतर गाडीला डबल इंजिन बसवण्यात आले होते. मात्र तिचा वेग काही बदलला नाही. 

शकुंतला रेल्वे अनेक वर्ष वऱ्हाडवासियांची लाइफलाइन होती. विदर्भातील कापसाची बाजारपेठ प्रसिद्ध होते. रुई व गाठी विदेशात पाठवण्यासाठी या रेल्वेचा वापर व्हायचा. कापूस मँचेस्टरच्या कापड गिरण्यांना पुरविण्यासाठी उपयोगात आणला जायचा. तेव्हा कापूस मुंबईपर्यंत नेण्याची व्यवस्था नव्हती. त्यासाठी कापूस अकोला, मूर्तिजापूर यासारख्या ब्रॉडगेज असलेल्या रेल्वेस्टेशनवर आणणे गरजेचे होते. येथून कापूस रेल्वेने मुंबईत व नंतर जहाजाने मँचेस्टरला जात असे. या चार जिल्ह्यातील कापूस आणण्यासाठी त्या भागात रेल्वे आवश्यक होती. त्यामुळे ही रेल्वे टाकण्यात आली. विकासाच्या दृष्टीने व औद्योगिक व्यवसायाला चालना देण्याच्या हेतूने ब्रिटिशांनी ही रेल्वे सेवा सुरू केली होती.