Sangli Samachar

The Janshakti News

अजूनही बसून आहे, मिटता घोळ मिटेना, विशाल की मशाल ठरता ठरेना !



सांगली समाचार - दि. १८ मार्च २०२४
मुंबई - "अजूनही रुसून आहे खुलता कळी खुलेना" पंडित कुमार गंधर्व यांनी आजरामर केलेल्या, कवी अनिल यांच्या या भावगीताची प्रचिती सध्या वेगळ्या प्रकारे सांगलीच्या जनतेला येत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा घोळ महाआघाडीच्या दरबारात सुरू आहे. 

एकीकडे ठाकरे गट सांगलीच्या जागेवर अडून बसला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस या जागेवरील हक्क सोडायला तयार नाही. 2014 आणि 2019 अशा सलग दोन पराभवानंतरही सांगलीतील काँग्रेसची मंडळी हॅटट्रिकच्या तयारीत असलेल्या भाजपाला यावेळी पराभवाची धूळ चारायचीच, या इराद्याने मैदानात उतरला आहे परंतु पै. चंद्रहार पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन पायात पाय घालण्याचे धोरण शिवसेना ठाकरे गटाने अवलंबल्याचे दिसते आहे.

या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व इच्छुक उमेदवार विशाल पाटील, आ. विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका जयश्रीताई पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ मुंबई ठाण मांडून बसले आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा सोडायची नाही, या इर्षेने सांगलीतील काँग्रेसची मंडळी पेटून उठली आहेत. आत्ता नाही तर कधीच नाही, हा इरादा पक्का करून राज्य व केंद्रीय पातळीवरील वरिष्ठांशी सांगलीच्या जागेबद्दल हट्ट धरला आहे. कारण यावेळी ही जागा विशाल पाटील यांना मिळाली नाही. किंवा जागा मिळूनही पुन्हा पराभवाच्या हॅट्रिकची नामुष्की पत्करावी लागली, तर दादा घराण्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि म्हणूनच सांगलीच्या लोकसभेची जागा मिळवायचीही, आणि संसदेत दणकून प्रवेश करायचाही असा निर्धार दादा घराणे व जिल्ह्यातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी केला आहे. 

दरम्यान दुपारपर्यंत महाआघाडीच्या बैठकीत महाराष्ट्रातील सर्वच जागांची यादी जाहीर होणार असल्याने या यादीत विशाल पाटील यांचे नाव निश्चित होते की ठाकरे गटाच्या पै. चंद्रावर पाटील यांचे यावर पुढील लढत आणि चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत सर्वत्र उत्सुकता वाढून राहणार आहे.