Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत प्रचारात रंग भरण्यापूर्वी रुसवे फुगवे सुरूच !



सांगली समाचार - दि. २६ मार्च २०२४
सांगली - सांगली लोकसभेच्या आखाड्यात भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि ठाकरे शिवसेनेकडून पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी मविआमधील उमेदवारीवरून जागा वाटपाचा पेच कायम असल्याने रंगत आलेली नाही. मात्र, जाहीर झालेल्या दोन्ही उमेदवारांनी दुसर्‍या फळीतील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या असल्या तरी ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीतील असल्याने घटक पक्षाचे रूसवे फुगवे सुरू झाले आहेत. आमंत्रणविना उपस्थित राहायला कोणी तयार नाही, तर काहीजण विनानिमंत्रणाचे मांडवात येऊन रिकाम्या खुर्चीचा आसरा शोधत आहेत.

भाजपचे उमेदवार खासदार पाटील यांना पक्षाने तिसर्‍यांदा संधी दिली आहे. यामुळे त्यांच्यादृष्टीने ही निवडणूक सोपी वाटत असली तरी पक्षांतर्गत असणार्‍यानाराजीवर मात्रा शोधण्याचे कामही सुरू आहे. नाराज मंडळींची पक्षीय पातळीवरून बोलणी करून देणे, त्यांच्या गाठीभेटी घेत प्रचारासाठी वेळ काढण्याची आर्जवे करणे एकीकडे सुरू असताना दुसर्‍या बाजूला महायुतीतील घटक पक्षांना मात्र दुर्लक्षित केले जात असल्याची चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये महायुतीच्या सर्व घटक पक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना बोलावण्यात आले होते. मात्र, अन्य घटक पक्षांच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांना आमंत्रित करण्यात आले नसल्याचा आरोप होत आहे. यामुळे महायुतीमध्ये मानापमान नाट्य रंगत आहे.

महायुतीमध्ये १६ घटक पक्ष आहेत. या सर्व पक्षांचे पदाधिकारी मेळाव्याला आमंत्रित करणे, स्थानिक पातळीवर प्रचारादरम्यान, त्यांना सोबत घेणे अपेक्षित आहे. मानसन्मान मिळाला तरच महायुतीच्या प्रचारात ही मंडळी सक्रिय होऊ शकतात. मात्र, विरोधकांची ऐक्य एक्सप्रेस जागा वाटपाच्या चर्चेत गुंतली असल्याने भाजपला ही निवडणूक सोपी वाटत आहे. यामुळे आले तर सोबत, न आले तर त्यांच्याविना अशी भूमिका तर नाही ना, अशी शंका घटक पक्षांकडून व्यक्त करण्यात येत आहे. महायुतीमध्ये सांगलीच्या जागेवर कोणी हक्कच सांगितला नव्हता. घटक पक्षांचा जागेबाबत आग्रह नसला तरी भाजपअंतर्गत उमेदवारीचा संघर्ष असताना भाजपने पहिल्या यादीत सांगलीच्या उमेदवारीचा विषय हातावेगळा करून विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली. याबद्दलही घटक पक्षांची फारशी तक्रार नाही. मात्र, सभा, बैठका, मेळाव्यामध्ये मानसन्मान मिळाला पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी मात्र मेळाव्याचे आमंत्रण मिळाल्याचे सांगितले. गतवेळी लोकसभेला खासदार पाटील यांचा प्रचार करणे पक्षादेशामुळे अडचणीचे होते. आता मात्र गतवेळची मैत्री आणि प्रचाराची दिशा उघड असल्याने मोठ्या जोमाने भाजपचा प्रचार करणे सोपे होत असल्याचे सांगितले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरजेतील जनसंवाद मेळाव्यात पहिलवान पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसकडून संतप्त भावना निर्माण होत आहेत. काँग्रेसच्या हक्काच्या जागेवर मविआची उमेदवारी ठाकरे शिवसेनेला दिली कोणी, असा सवाल उपस्थित करून कोणत्याही स्थितीत काँग्रेसचे विशाल पाटील उमेदवार असल्याचे ठामपणे सांगितले जात आहे. एकीकडे भाजपने स्वबळावर प्रचार प्रारंभ केला असून महाविकास आघाडीत जागा वाटपावरून तेढ निर्माण झाल्याने प्रचाराच्या पातळीवर शांतताच आहे. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अगदीच तोळामासा, त्यात ५१० गावे, ८ नगरपालिका, नगरपंचायती आणि एक महापालिका असा पसारा असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघात हा वाद मिटला हे सांगण्यास प्रचाराचा काळ निघून जाणार आहे. मग उरलेल्या काळात मतदारसंघासाठी काय करणार हे कधी सांगणार हाही प्रश्‍नच आहे.