सांगली समाचार - दि. २२ मार्च २०२४
पुणे -देशात बिटकॉईनचा पहिला गुन्हा पुण्यात दाखल झाला अन् त्याचा तपासही खोलवर करण्यात आला. पण, तपासातच गोलमाल करणाऱ्यांचा नंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला होता. मात्र, पोलीस दलात मोठे फेरबदल झाल्यानंतर गोलमालाचा पर्दाफाश करणाऱ्या पोलीस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचीच चौकशी मॅडम साहेबांच्या आदेशाने 'अनऑफिशीयल' सुरू केल्याने पोलीस दलात मोठी चर्चा सुरू झाली होती. मात्र, चर्चेला उधाण आल्यानंतर चौकशीप्रकरण थंडावले. विशेष म्हणजे, चौकशी करणाऱ्यांनीच त्यात काहीच चुकीचे नसल्याचे स्पष्ट सांगत 'बळच' काही करण्यासही नकार दिल्याची माहिती आहे.
दोन कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू
पोलीस दलात मोठे फेरबदल झाल्यानंतर मॅडम साहेबांच्या आदेशाने ही अनऑफिशीयल चौकशी दोन पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली होती. त्यासाठी त्यांचे मोबाईलही काढून घेतले होते. एवढेच नाही तर नांदेड येथील एका तक्रारदाराचा जबाब त्याच्या घरी जाऊन नोंदविल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच ज्या व्यक्तीकडून याबाबतचे लेखापरिक्षण केले त्यांना देखील चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. याबाबत वरिष्ठांना अनेकदा माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता वरिष्ठांकडून बोलणे टाळले जात होते.
नेमकं प्रकरण काय आहे…
बिटकाईनमध्ये आकर्षक परतावा देण्याचे आमिषाने अमित व विवेक भारद्वाज या दोघांनी सुमारे साडेचारशे पेक्षा अधिक जणांना आर्थिक गंडा घातला होता. दोघांनी कोट्यावधी रुपयांची अफरातफर केली होती. याप्रकरणी २०१८ मध्ये पर्वती (तत्कालीन दत्तवाडी व निगडी पोलिसांत दोन गुन्हे दाखल झाले होते. हा गुन्हा तांत्रिक असल्याने अतिवरिष्ठांच्या परवानगीने पोलिसांनी दोघा सायबर तज्ज्ञांना नेमले होते. तसेच, मुख्य आरोपी अमित भारव्दाजसह १७ जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून २४१ बिटकॉईन जप्त केले होते.
अप्पर पोलीस महासंचालकांकडून चौकशीचे आदेश
राज्य आर्थिक गुन्हे शाखेच्या अप्पर पोलिस महासंचालकांकडून सप्टेंबर २०२० मध्ये या तपासाबाबत पुन्हा चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर सेल दिले होते. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास २०२१ मध्ये पुन्हा सुरू केला. गुन्ह्यात झालेल्या तांत्रिक तपासाचे फॉरेन्सिक ऑडिट केले. त्यावेळी तत्कालीन तपासात संशयास्पद गोष्टी आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी दोन तज्ञांना घरातून अटक केली. त्यांनी डेटाचा गैरफायदा घेत एका तज्ञाने आरोपीच्या वॉलेटमधील बिटकॉईन स्वत:च्या वॉलेटमध्ये वर्ग करून घेतले होते. तपासामध्ये त्याने ६० पेक्षा जास्त बिटकॉईन स्वतः च्या वॉलेटमध्ये वर्ग करून घेतल्याचे दिसले. तसेच, इतर साथीदारांच्या वॉलेटवर ही बिटकॉईन वर्ग केल्याचे आढळून आले होते. जप्ती पंचनामे करताना आरोपींच्या वॉलेटमधील ब्लॉकचेनचे स्क्रीनशॉट बनावटीकरण केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. खोलवार तपास केल्यानंतर चांगलाच गोंधळ उडाला होता.
तरीही त्याच अधिकाऱ्यांचीच चौकशी..!
बनावट स्क्रीनशॉटच्या खरे असल्याचे भासवून तपासासाठी सादर केल्याचे समोर आले होते. त्यामुळे खोलात जाऊन तपास करून चोरांवरील मोर शोधून देखील या अधिकारी कर्मचार्यांवर चौकशीच्या फेर्यात उभे केले जात असल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. मात्र तुर्तास तरी ही चौकशी थांबल्याचे दिसून येत आहे.