सांगली समाचार - दि. ६ मार्च २०२४
मुंबई - महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली लोकसभा मतदार संघाची जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे, यासाठी मंगळवारी मुंबईत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ठाकरे गट किंवा वंचित बहुजन आघाडीला सांगलीची जागा सोडल्यास निवडणुकीत गृहीत धरू नका, असा इशाराही दिला. दरम्यान, सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
मुंबईत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीत सांगली लोकसभा निवडणुकीबाबत बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद गटनेते सतेज पाटील, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री नसीम खान, आमदार प्रणिती शिंदे प्रमुख उपस्थित होते. सांगलीतून माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील व जिल्हा काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात सांगली लोकसभेची जागा शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्याच्या चर्चाचे पेव फुटले आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी यांनी प्रदेश काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. लोकसभेची सांगलीची जागा कोणत्याही स्थितीत काँग्रेसलाच मिळाली पाहिजे, अशी मागणी आक्रमकपणे केली.
डॉ. विश्वजित कदम म्हणाले, सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत सांगली लोकसभेची जागा आघाडीच्या जागावाटपात स्वाभिमानीला सोडली. त्यावेळी पक्षाचे चिन्ह नसल्याचा फटका काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांना बसला. त्यांच्यावर तो अन्याय झाला. लोकसभेची २०२४ ची निवडणूक जिंकायचीच, या ध्येयाने जिल्ह्यातील काँग्रेसने वर्षभर तयारी केली आहे. काँग्रेसला वातावरण चांगले आहे. जिल्ह्यात पक्षात विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर एकमत झालेले आहे. जिल्ह्यात लोकांमध्ये भाजपविषयी नाराजी असून काँग्रेसचा विजय निश्चित आहे. सांगलीची जागा कॉंग्रेसकडेच राहिली पाहिजे अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील नेत्यांनी केली.
शिवसेना, वंचितला जागा ही वावडी : नाना पटोले
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच लढणार आहे. जागावाटपात ही जागा शिवसेना (उबाठा) अथवा वंचित बहुजन आघाडीला मिळाली असल्याची बातमी ही वावडी आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची बुधवारी बैठक होणार आहे. सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील.
विशाल पाटील म्हणाले, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेस एकसंघ आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित आहे. जागा वाटपात सांगली काँग्रेसकडेच राहिली पाहिजे.
जयश्री पाटील म्हणाल्या, सांगली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी विशाल पाटील यांना मिळावी, यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचे एकमत आहे. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली आहे. विशाल पाटील यांनाच उमेदवारी द्यावी.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगलीची जागा काँग्रेसचीच असली पाहिजे. डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली ही जागा निवडून आणू. सांगलीची जागा शिवसेना (उबाठा) अथवा बंचित बहुजन आघाडीला दिल्यास सांगली जिल्हा काँग्रेसला गृहीत धरू नये. प्रसंगी पक्षत्याग करू, असा इशारा कार्यकत्यांनी दिला आहे. ही जागा घटकपक्षाला देणे म्हणजे भाजपला बक्षीसपत्र दिल्यासारखे होईल. त्यामुळे प्रदेश काँग्रेसने सांगलीची जागा आघाडीतील अन्य घटकपक्षांना सोडू नये. जिल्ह्यात काँग्रेसला चांगले बातावरण आहे. भारत जोडो यात्रेत जिल्ह्यातील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाभर काँग्रेसची जनसंवाद यात्रा झाली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे दौरे झाले. त्या दौन्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर जमादार, प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, शशिकांत नागे, माजी उपमहापौर उमेश पाटील, अय्याज नायकवडी, सुभाष खोत, अजित ढोले, विशाल चौगुले, संजय हजारे, र जत तालुका काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब कोडग, आप्पाराया बिराजदार, संजय कांबळे, महेश साळुंखे, संदीप आडमुठे, अमित पारेकर, गजानन सुतार, अमित पाटील, प्रकाश जगताप, नितीन बेदमुथा, रोहित कबाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
एवढे कार्यकर्ते कशासाठी
पटोलेंच्या अभिनंदनासाठी
प्रदेश काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीला या जिल्ह्यातील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते की, त्याकडे लक्ष वेधत 'एवढे कार्यकर्ते कशासाठी आलेत ?', असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. त्यावर 'सांगलीची जागा काँग्रेसच लढवणार आहे, असे तुम्ही सकाळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तुमचे अभिनंदन करण्यासाठी आलो आहोत', असे दोन तीन कार्यकर्ते म्हणाले. त्याला पटोले यांनी दाद दिली.