सांगली समाचार - दि. २९ मार्च २०२४
सांगली - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी स्वतःची मते कुठल्याही प्रकारची असली, तरी श्री. रणदीप हुडा या अभिनेत्यासाठी, त्याने घेतलेल्या कष्टांसाठी हा चित्रपट पहाणे अत्यंत आवश्यक आहे. सौजन्य : ZEESTUDIOS
विशेषत: चित्रपटाच्या मध्यांतरानंतर सेल्युलर कारागृहात शिक्षा भोगतांना विनायक दामोदर सावरकर या व्यक्तीमत्त्वात झालेले शारीरिक, मानसिक आणि वैचारिक पालट हा या चित्रपटाचा सर्वांत अप्रतिम भाग आहे. भूमिका जगणे म्हणजे काय ? हे श्री. रणदीप यांनी दाखवून दिले आहे. तरुण ते वयोवृद्ध सावरकर साकारतांना बोलीत आणि देहबोलीत होणारे पालट तर फारच सूक्ष्मपणे दाखवले आहेत.
१. चित्रपटात घेतलेले अप्रतिम प्रसंग !
सावरकर आणि मदनलाल यांची मैत्री, त्यांची शेवटची भेट आणि त्यांची पुन्हा त्याच वाक्याने आठवण झाल्याने मिठी मारण्याचा चित्रपटातील प्रसंग पुष्कळ छान आहे. चष्मा फुटल्याने भेटायला आलेलेल्या व्यक्ती अंधूक दिसणे आणि ते निघून गेल्यावर चष्मा हाती येणे, या प्रसंगाची सांगड पुन्हा नंतर झालेल्या भेटीत घालणे, हे प्रसंग पुष्कळ काही सांगून जातात.
प्रतिदिन निकृष्ट दर्जाचे अन्न खाल्ल्यानंतर 'ऑफर' (देऊ) केलेला 'ब्रेड' (पाव) नाकारणे; प्रारंभीला तिघे भाऊ जेवतांना 'अन्नाचा अपमान करू नये', असे म्हणणे आणि तुरुंगातून सुटून घरी आल्यानंतर वाढलेल्या ताटावरून उठून जाऊन ओक्साबोक्षी रडणे या प्रसंगांची गुंफण अन् मानवी भावभावनांची सांगड केवळ अप्रतिम !
२. चित्रपटात पुढील गोष्टींचाही विचार व्हायला हवा !
क्रांतीकारकांच्या कार्यपद्धतीविषयीही चित्रपटात पुष्कळ गोष्टी मांडल्या आहेत, ज्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात कधी आल्याच नाहीत. अनेक गोष्टी चित्रपट थेटपणे मांडतो. मग त्या कुणाला पटोत वा न पटोत, हा चित्रपटाचा गुणही आहे आणि दोषही !
सावरकर यांचा सगळा जीवनपट, त्यांची राजकीय आणि सामाजिक मते, त्यांच्यावर घेतलेले आक्षेप या सगळ्यांना केवळ ३ घंट्यांत बसवणे शक्यच नाही. त्यांची व्याप्ती एवढी मोठी आहे की, प्रत्येक गोष्टीवर एक चित्रपट होऊ शकेल. सगळ्या घटनांना मांडणे, सगळ्या आक्षेपांचे उत्तर देणे किंवा त्यांचा धावता; पण विस्तृत आलेख घेणे याची चित्रपटात तेवढी आवश्यकता नव्हती. साहित्यिक म्हणून असलेले सावरकर यांचे कार्य थोडेसे दुर्लक्षित राहिले. दुसरे महत्त्वाचे, म्हणजे संस्कृत आणि मराठी भाषेतील शब्दांच्या उच्चारणाकडे झालेले दुर्लक्ष. खास करून 'हिंदु' या व्याख्येचे हिंदीतून केलेले विश्लेषण छान आहे; पण ती संस्कृतमध्ये सांगतांनाचे उच्चार खटकतात.
भाषाशुद्धीविषयी आग्रही असणार्या सावरकर यांचे अशुद्ध संस्कृत उच्चार नाही म्हटले, तरी कानाला त्रास देतात. या अत्यंत किरकोळ गोष्टी आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या एकूण परिणामावर बाधा होत नाही. 'मध्यांतर चुकीच्या जागी झाले', असे पहिल्या प्रथम पहातांना वाटते; पण ते पुढे सावरकर यांच्यामध्ये घडलेले पालट दाखवल्याने अप्रासंगिक वाटत नाही.
३. सावरकर यांना वाळीत टाकण्यास 'हिंदु' आणि 'हिंदुत्वाची भूमिका' फार महत्त्वाची ठरणे
सावरकरांच्या इतका दुर्दैवी देशभक्त जगात दुसरा नसेल. पहिले दुर्दैव म्हणजे जन्म. एक वेळ ज्या जातीत जन्मले ते एवढे महत्त्वाचे आणि मोठे कारण नाही; पण त्यांनी घेतलेली 'हिंदु' आणि 'हिंदुत्वाची भूमिका' त्यांना वाळीत टाकण्यास कारणीभूत ठरली. त्यामुळे सावरकर यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन, सामाजिक समतेसाठी केलेल्या कार्याविषयी त्यांना पुरोगामी असण्याचे श्रेय देण्याचा उदारपणा 'फुशाआं' (फुले, शाहू आणि आंबेडकर यांना मानणारे) पुरोगामी दाखवत नाहीत, तर त्यांच्यावर टीका करण्यात धन्यता मानतात.
४. देशासाठी झुंडशाही चिंताजनक !
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झुंडशाहीतून झालेली देशभक्तांची विभागणी पद्धतशीरपणे पोसली जात आहे, हे पुष्कळच चिंताजनक आहे. 'अखंड भारत' हे सर्व देशभक्तांचे स्वप्न काही साकार झाले नाही. ते होऊ नये, यासाठी जी वैचारिक शक्ती तेव्हा कार्यरत होती, तीच आजही पडद्याआड राहून झुंडशाहीला सूत्रसंचालित करत आहे.