सांगली समाचार - दि. ६ मार्च २०२४
नवी दिल्ली - लोकांना एकमेकांशी कनेक्टेड राहता यावं, आणि काही काळ विरंगुळा व्हावा या उद्देशाने सोशल मीडिया सुरू झाला होता. मात्र आता जगभरातील लोकांना सोशल मीडियाचं व्यसनच लागलं आहे. यामुळेच कित्येक मानसिक आणि शारीरिक आजारांना देखील निमंत्रण मिळत आहे. 'पॉपकॉर्न ब्रेन' हा नवा आजारही सोशल मीडियामुळे पसरत असल्याचं रिसर्चमध्ये समोर आलं आहे.
टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सगळ्यात आधी शॉर्ट व्हिडिओंचा फॉरमॅट समोर आणला होता. हा प्लॅटफॉर्म कित्येक देशांमध्ये बॅन झाला आहे. टिकटॉकनंतर इन्स्टाग्राम आणि यूट्यूबनेही शॉर्ट व्हिडिओंचा फॉरमॅट कॉपी केला होता. यानंतर लोकांच्या दैनंदिन सोशल मीडिया वापरात भरमसाठ वाढ झाल्याचं कित्येक रिसर्चमध्ये समोर आलं आहे.
काय आहे पॉपकॉर्न ब्रेन?
जर तुम्ही दररोज सोशल मीडियाचा वापर करता, आणि तुम्हाला एखाद्या कामात अधिक वेळ फोकस करता येत नसेल; तर तुम्हाला पॉपकॉर्न ब्रेन आजाराची लागण झालेली असण्याची शक्यता आहे. २०११ साली यूडब्ल्यूआय स्कूलमधील संशोधकांनी ही टर्म समोर आणली होती. डिजिटल जगात एकाच वेळी अनेक विंडो ओपन करून, वारंवार स्क्रोल करून व्यक्तीचे विचार स्थिर राहत नाहीत. परिणामी खऱ्या जगातही एका गोष्टीवर अधिक वेळ फोकस करणं शक्य होत नाही. आपले विचार कढईतील पॉपकॉर्नप्रमाणे इकडे-तिकडे उडू लागतात, म्हणूनच या आजाराला पॉपकॉर्न ब्रेन असं नाव दिलं आहे.
दीर्घकालीन आजार घातक
पॉपकॉर्न ब्रेनची लक्षणं दीर्घ काळापर्यंत राहिली, तर त्याचा व्यक्तीच्या स्मरणशक्तीवर आणि लर्निंग स्किलवर देखील गंभीर परिणाम होऊ शकतो. सोबतच नैराश्य, अति चिंता असे आजार होण्याचीही भीती यामुळे निर्माण होते. यामुळे वेळीच यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. पॉपकॉर्न ब्रेनचा धोका कमी करून, एकाग्रता वाढवण्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे..
डिजिटल डीटॉक्स - आठवड्यातून एकदा किंवा दिवसातून काही तास सोशल मीडिया किंवा डिजिटल उपकरणांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
सिंगलटास्किंग - एकाच वेळी अनेक कामे करण्याऐवजी, एकाच कामावर लक्ष द्या. हातातील काम पूर्ण झाल्यावर पुढील काम करायला घ्या.
मेडिटेशन - डिजिटल डीटॉक्स करताना मोबाईल किंवा इतर उपकरणे बाजूला ठेऊन मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा. या वाचलेल्या वेळात तुम्ही योग किंवा व्यायामही करू शकता.