yuva MAharashtra चिमणीने केला मुंबई ते कझाकिस्तानचा प्रवास

चिमणीने केला मुंबई ते कझाकिस्तानचा प्रवास




सांगली समाचार - दि. २५ मार्च २०२४
मुंबई - मोठ्या पक्ष्यांना आजपर्यंत टॅग लावून त्यांच्या प्रवासाची गाथा उलगडली गेली आहे, पण आपल्यातील आपली छोटीशी चिमणी देखील लांबचा प्रवास करू शकते, हे कदाचित पहिल्यांदाच समोर आले आहे. भारतीय खंडात आढळणाऱ्या तीन उपप्रजातींपैकी ‘स्पॅनिश स्पॅरो’ या प्रजातीच्या एका चिमणीने मुंबई ते कझाकिस्तान प्रवास ८१ दिवसांतच पूर्ण केला आहे. हा सर्वांत कमी कालावधी मानला जातो. तर काही चिमण्यांनी कझाकिस्तानशिवाय रशिया, नैऋत्य ताजिकिस्तान आणि पाकिस्तानापर्यंतही उड्डाण केलेले आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) ने अलीकडेच सादर केलेल्या एका संशोधन अहवालात या स्थलांतराची माहिती संशोधकांनी नोंदवली आहे.

‘स्पॅनिश स्पॅरो’ प्रजातीमधील चिमणीला मुंबईत टॅग लावण्यात आला. यावेळी तिने कझाकिस्तानच्या जांभीलपर्यंतचा प्रवास ८१ दिवसांत पूर्ण केल्याचे दिसून आले. आजतागायत चिमण्यांची जेवढी स्थलांतर झाली आहेत, त्यातील स्थलांतराचा सर्वाधिक कालावधी हा आठ वर्षाचा आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने पाच चिमण्यांना टॅग केले. त्यापैकी चार चिमण्या राजस्थानमधील भरतपूर येथे तर एक चिमणीला अलीकडच्या कालावधीत मुंबईत टॅग करण्यात आले.


भरतपूर येथे टॅग करण्यात आलेल्या चारपैकी एक चिमणी कझाकिस्तानचा जांभिल येथे जाऊन पुन्हा भरतपूर ला परतली. तर भरतपूरची एक चिमणी आठ वर्षांनी पाकिस्तानच्या हझो जिल्ह्यात आढळली. हाऊस स्पॅरो उपप्रजातीच्या आठ चिमण्यांच्या नोंदी संशोधकांनी नोंदवल्या आहेत. भरतपूर येथे रिंग केलेली ही चिमणी रशिया, कझाकिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये आढळली. नैऋत्य कझाकिस्तानमध्ये तीन आणि उत्तर कझाकिस्तानमध्ये एका चिमणीची नोंद झाली आहे. कझाकिस्तानातील तीन चिमण्यांपैकी एक दिल्लीत आणि तामिळनाडूच्या पॉईंट कॅलिमर वन्यजीव अभयारण्यात रिंग केलेली एक चिमणी बांगलादेशात आढळली. या प्रजातींतील चिमणीने सर्वांत कमी म्हणजे ९९ दिवसांत तर एकीने तीन वर्षांत स्थलांतर केल्याची नोंद आहे.