Sangli Samachar

The Janshakti News

डोळ्यांच्या स्कॅनिंगवर आता रेशन मिळणार !


सांगली समाचार - दि. २२ मार्च २०२४
सांगली : आधार नोंदणी होऊन अनेक वर्षे झाल्याने आणि कष्टकरी, कुष्ठरोगी यासह अनेकांचे हाताचे ठसे जुळत नसल्याने रेशन दुकानदार आणि ग्राहकांमध्ये अनेकदा वाद निर्माण होत असल्यामुळे डोळ्यांच्या स्कॅनिंगद्वारेही आता रेशनवरील धान्य देण्यात येणार आहे. 'आयरिस' स्कॅनरची सुविधा येत्या दोन महिन्यात सांगली जिल्ह्यात सुरु होणार आहे. यामध्ये सर्व्हरची सुविधाही सुधारण्यात येणार आहे. यामुळे रेशन वितरणाला गती येणार आहे.


गेल्या आठ ते दहा वर्षांपासून ई- पॉस मशिनवरुन धान्याचे वितरण करण्यात येत आहे. यामुळे धान्य वितरणात अडचणी येत आहेत. सध्या अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना रेशनवरून मोफत धान्य दिले जाते. लाभार्थ्यांच्या हाताचे ठसे या ई-पॉस मशिनवरून घेऊन त्याची ओळख पटवली जाते. त्यानंतरच धान्याचे वितरण होते. कष्टकरी, दिव्यांग, वयोवृद्ध आदींचे हाताचे ठसे योग्य पद्धतीने उमटत नसल्याने त्याचा मोठा फटका बसत आहे. यामुळे रेशन दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वादावादीचे प्रसंगी उद्भवत आहेत. यामुळे ई-पॉस मशिन बदलून द्यावे, अशी मागणी धान्य दुकानदारांकडून होत होती. यामुळे शासनाने आता सर्वच दुकानदारांना 'आयरिस' प्रणालीसह ई-पॉस मशिन देण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती रेशन दुकानदार संघटनेला देण्यात आली आहे. या मशीनमुळे डोळ्यांच्या स्कॅनिंगद्वारे लाभार्थ्यांची ओळख पटण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर सर्व्हरमध्येही सुधारणा करण्यात येणार आहे. यामुळे रेशनवरील वस्तूंच्या वितरणास गती प्राप्त होणार आहे.