सांगली समाचार - दि. १२ मार्च २०२४
मुंबई - महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जागावाटपासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बैठका पार पडत आहेत. पण या बैठकांमध्ये अजूनही ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत जवळपास 35 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 3 ते 4 आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ 8 ते 10 जागा मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. महायुतीच्या जागावाटपाचा हा फॉर्म्युला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य नसल्याची चर्चा आहे. महायुतीच्या जागावाटपासाठी दिल्लीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पुन्हा बैठक होणार होती. अजित पवार यांनी कालच याबाबत माध्यमांसमोर माहिती दिली होती. पण ही बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे.
कमी जागा मान्य नसल्यामुळे शिंदेंची दिल्लीवारी रद्द झाली, अशी चर्चा आहे. त्यामुळे जागावाटपावरुन महायुतीत घमासान सुरु असल्याचं चित्र आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील, असं म्हटलं आहे. तर शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी फडणवीसांच्या याच विधानावरुन भाजपला उपरोधिक टोला लगावला आहे. सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर त्यांचा सन्मान करु, असं भरत गोगावले यांनी भाजपला उपरोधिकपणे म्हटलं आहे.
दिल्लीत भाजपच्या गोटात जोरदार हालचाली
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते दिल्लीला गेले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला गेले आहेत.
केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीआधी महाराष्ट्र भाजप राज्य कोअर कमिटीची बैठक पार पडली. भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी भाजपच्या मुख्यालयात दाखल झाले आहेत. या बैठकीत महाराष्ट्रातील भाजपच्या लोकसभेच्या जागांवर शिक्कामोर्तब होणार आहे. 10 राज्यांमधील भाजप उमेदवारांवर या बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.