सांगली समाचार- दि. १ मार्च २०२४
मनमाड - नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्यावर जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले. ही घटना रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. भिडे गुरुजी हे येवला येथून मालेगावला जात असतांना काही लोकांनी त्यांची गाडी अडवत त्यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी जमावाने जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक झालेल्या काहींनी थेट भिडे यांच्या गाडीवर हल्ला करत गाडीच्या काचा फोडल्या. पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने या हल्ल्यातून ते बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार संभाजी भिडे गुरुजी हे मालेगावला एका कार्यक्रमाला जात होते. यावेळी त्यांच्या गाडीचा ताफा हा मनमाड येथे आला असता, काही लोकांकडून त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना जमावाने काळे झेंडे दाखवत संभाजी भिडे मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. हातात भिडे यांचे निषेध करणारे काळे झेंडे आणि बॅनर देखील काही तरुण घेऊन आले होते. यातील काही तरुणी आणि तरुणांनी भिडे यांची गाडी अडवली. या वेळी संभाजी भिडे ही पुढील सीटवर बसलेले होते. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या गाडीवर हल्ला केला. काचावर आणि गाडीच्या पुढील भागावर जोरजोरात हाताने मारण्यात आले. यात त्यांच्या गाडीची काच फुटली. तर एकाने पायातील बूट काढून गाडीवर मारला. यावेळी पोलिसांकडून आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिस घटनास्थळी असल्याने त्यांनी तातडीने जमावाला पांगवले. पोलिसांनी रस्ता मोकळा करून दिल्यावर भिडे गुरुजी पुढे मालेगावच्या दिशेने निघाले. दरम्यान काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.