Sangli Samachar

The Janshakti News

"निवडणुकीनंतर आमचे विरोधक गाणं म्हणतील, "जिंदगी इम्तिहान लेती है..", देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी



सांगली समाचार - दि. ९ मार्च २०२४
मुंबई  - लोकसभा निवडणूक पुढच्या आठवड्यात जाहीर होऊ शकते. या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीने ठेवलेलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही कंबर कसली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत हे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सभांचा धडाका सुरु झाला आहे.

निवडणूक जाहीर झाली की प्रचारसभांचा धडाका सुरु होणार

निवडणूक जाहीर झाली की प्रचारसभांचा धडाका सुरु होईलच. मात्र सध्या बैठका, जागावाटप, उमेदवारी यावर चर्चेच्या फेऱ्या, दिल्लीच्या वाऱ्या असं सगळंच सुरु आहे. या सगळ्यातून वेळ काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहिले होते. या पुरस्कार सोहळ्यात महेश काळे आणि सुमन कल्याणपूर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात येणारे लोक, तिकिट वाटप आणि विरोधक या तिघांसाठी गाण्याच्या तीन ओळी सांगितल्या. ज्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.


देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या खास भाषणशैलीसाठी आणि कोपरखळ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. नाट्य परिषदेचा अध्यक्ष झाल्यावर मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटलं हे जेव्हा प्रशांत दामले म्हणाले होते तेव्हा हेच तुम्ही आमच्या राजकारण्यांना शिकवलंत तर किती बरं होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यांविषयी भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांचा तोच अंदाज पाहण्यास मिळाला. महाराष्ट्र टाइम्सच्या म.टा. सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर आणि शास्त्रीय गायक महेश काळे यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एक छोटेखानी भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी तीन गाण्यांच्या ओळी सांगत आपल्या मिश्किलपणाचा परिचय पुन्हा एकदा दिला. 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“सुमन कल्याणपूर यांनी १३ विविध भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत. त्यांचं कुठलं गाणं चांगलं हे ठरवायची वेळ येते तेव्हा अनेक प्रश्नांची उत्तरंही आम्हाला सापडतात. जेव्हा अनेक पक्ष आमच्याकडे येतात, तेव्हा आम्हाला म्हणावंसं वाटतं “आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबानपर”, जेव्हा आम्ही तिकिट वाटपासाठी बसतो तेव्हा म्हणावंसं वाटतं “तुम्हे प्यार करते हैं करते रहेंगे..” आणि निवडणुका पूर्ण झाल्या की “जिंदगी इम्तहान लेती है” हे आमचे विरोधक म्हणतील” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. म.टा. सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे वक्तव्य केलं आहे.