Sangli Samachar

The Janshakti News

लोकसभेच्या आखाड्यात गटातटाचे राजकारण; घोरपडे-सगरे गटातील नेते 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत



सांगली समाचार - दि. २४ मार्च २०२४
सांगली - लोकसभेची निवडणूक  प्रक्रिया जाहीर झाल्याने कवठेमहांकाळ तालुक्यात राजकीय वातावरण उन्हाळ्यात गरमागरम होऊ लागले आहे. सद्यःस्थितीत निवडणूक आखाड्यात तालुक्याच्या राजकारणात नेत्यांची भूमिका 'वेट अँड वॉच' अशी असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील राजकारणाने प्रत्येक निवडणुकीत नेहमीच वेगळे वळण घेतले आहे. कधी युती, कधी आघाड्या, तर कधी विरोध असे चित्र गत काही निवडणुकांमध्ये तालुक्यात दिसून आले आहे.

माजी मंत्री अजितराव घोरपडे गट, आमदार सुमन पाटील (Suman Patil) गट, 'महांकाली'च्या अध्यक्षा अनिता सगरे याचे गट आहेत. खासदार संजय पाटील यांचा तालुक्यात गट असून त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कोण कोणाशी युती करणार आणि कोणाला धक्का बसणार, हे लवकरच स्पष्ट होईल. कवठेमहांकाळ तालुका हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो.


सध्या तालुक्यात अजितराव घोरपडे यांना मानणारा मोठा गट आहे. त्यात घोरपडे यांनी अद्याप आपली कोणतीच भूमिका जाहीर केली नसल्याने ती निर्णायक ठरू शकते. भाजपकडून संजय पाटील यांना उमेदवारी घोषित झाली आहे. गुरुवारी (ता. २१) मिरजेत झालेल्या जनसंवाद मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाकडून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषित केली. मात्र या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. काँग्रेसकडून विशाल पाटील यांनी तयारी केली आहे.

जागेचा तिढा कायम असल्याने संजय पाटील यांच्या विरोधात कोण उभा राहणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. त्यानंतरच आमदार सुमन पाटील यांची भूमिका जाहीर होईल. सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात असल्याने महाविकास आघाडी समवेतच राहतील, असे चित्र आहे. तालुक्यात शिवसेना, काँग्रेस, बसप, रिपब्लिकन पक्ष असून या पक्षांतीलही नेत्यांनी अद्यापपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीबाबत कोणतीच भूमिका जाहीर केली नाही. मात्र दोन दिवसांपूर्वी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता उद्योजक मेळावा झाला.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजप आपला मित्रपक्ष असल्याचे सांगत युतीसमवेत असल्याचा जणू संदेशच दिला. यातच तालुक्यात खासदार संजय पाटील यांच्या समर्थकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी अजित पवार गट असून त्याच्याही भूमिकेकडे पाहावे लागेल. एकंदरीतच, लोकसभेच्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या आखाड्यात कवठेमहांकाळ तालुका महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत तालुक्यातील कोणत्याही नेत्याने भूमिका जाहीर केली नाही. तेव्हा कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

नेत्यांची सोयीस्कर भूमिका

दोन वर्षांपूर्वी झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत खासदार संजय पाटील, अजितराव घोरपडे, अनिता सगरे, माजी सभापती गजानन कोठावळे विरुद्ध राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील, रोहित पाटील अशी लढत झाली होती. त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुकीत अजितराव घोरपडे, आमदार सुमन पाटील विरुद्ध खासदार संजय पाटील, अनिता सगरे अशी लढत झाली होती. त्यामुळे तालुक्यात प्रत्येक वेळच्या निवडणुकीत तालुक्यातील पक्ष-गटाची वेगवेगळी सोयीस्कर भूमिका दिसून आली आहे.

बलाबल

जिल्हा परिषद घोरपडे -२ आर. आर. पाटील गट - २

पंचायत समिती घोरपडे -३ आर. आर. पाटील गट - ४ भाजप -१

नगरपंचायत घोरपडे -१ आर. आर. पाटील गट - ७ भाजप -७ अपक्ष - १

रिक्‍त-१