Sangli Samachar

The Janshakti News

काँग्रेसची माघार नाहीच! सांगली, भिवंडीसाठी झाला मोठा निर्णय, !



सांगली समाचार - दि. २९ मार्च २०२४
मुंबई - महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र काही जागांवरील तिढा अद्याप सुटलेला नाही. यामध्ये सांगली, भिंवडी, दक्षिण मध्य मुंबई अशा काही जागांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत अनेक बैठका होऊनही ठोस तोडगा निघत नसल्यामुळे काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

मैत्रीपूर्ण लढत करण्याची काँग्रेसची भूमिका

काँग्रेसच्या नेत्यांची आज (29 मार्च) ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत राज्यातील सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. शिवाय महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्निथला यांनीदेखील या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत मविआ तोडगा निघत नसलेल्या जागांवर चर्चा करण्यात आली. मविआच्या घटकपक्षांत आतापर्यंत अनेक बैठका झाल्या. मात्र तोडगाच निघत नसेल तर या जागांवर मैत्रिपूर्ण लढत करुया, अशी भूमिका या बैठकीत काही नेत्यांनी मांडली. विशेष म्हणजे या बैठकीचा अहवाल तसेच मैत्रीपूर्ण लढतीची करण्यात आलेली मागणी याबाबतची माहिती दिल्लीतील हायकमांडला दिली जाणार आहे.

येत्या 31 मार्च रोजी इंडिया

आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या भूमिकेवर निर्णय होणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या या भूमिकेवर नेमका काय निर्णय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोणकोणत्या जागांवर वाद?

महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र तरीदेखील काही जागांवरील वाद अद्याप कायम आहे. सांगली, भिंवडी, दक्षिण मध्य मुंबई या अशा काही जागा आहेत, जेथे काँग्रेसने माघार घेण्यास नकार दिला आहे. सांगलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर आमच्याशी चर्चा न करताच ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, असं काँग्रेसचं मत आहे. भिवंडीच्या जागेचीही हीच स्थिती आहे. भिवंडी या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत. काँग्रेसला जागा दिल्यास आम्ही वेगळा निर्णय घेणार, अशी भूमिका येथील स्थानिक नेत्यांनी घेतली आहे.

3 एप्रिल रोजी मविआची संयुक्त पत्रकार परिषद

दरम्यान, येत्या 3 एप्रिल रोज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेला मविआच्या तिन्ही घटकपक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेत नेमकी काय घोषणा होणार? महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.