सांगली समाचार - दि. ३१ मार्च २०२४
पाटणा : लग्नानंतर लहान-मोठ्या वाद विवादांदरम्यान अनेकदा पती-पत्नी एकमेकांसाठी अपशब्द वापरतात. काही वेळा हे भांडण मिटल्यानंतर हे अपशब्दही विस्मरणात जातात. मात्र, काही प्रकरणांमध्ये अशा शब्दांमुळे पती किंवा पत्नीचं मन खोलवर दुखावलं जाऊ शकतं. पाटणा हायकोर्टासमोर असंच एक प्रकरण आलं होतं. या प्रकरणाचा निर्णय देताना कोर्टाने एक महत्त्वाची टिप्पणीदेखील केली आहे. पाटणा हायकोर्टाने आयपीसी कलम 498अ अंतर्गत पतीविरोधात असलेले क्रूरतेचे आरोप रद्द केले आहेत. शिवाय भांडणादरम्यान किंवा इतर वेळी बोलताना पत्नीला 'भूत' आणि 'पिशाच्च' म्हणणं ही क्रूरता नाही, असं पाटणा हायकोर्टाने म्हटलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती बिबेक चौधरी यांच्या एकल खंडपीठाने 'भूत' आणि 'पिशाच्च' प्रकरणावर निर्णय दिला आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, नरेश कुमार गुप्ता नावाच्या व्यक्तीचा आणि ज्योती नावाच्या महिलेचा 1 मार्च 1993 रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह झाला होता. त्यानंतर ज्योतीचे वडील कन्हैयालाल यांनी नरेश कुमार गुप्ता आणि त्यांचे वडील सहदेव गुप्ता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आपल्या मुलीचा सासरच्या घरी शारीरिक आणि मानसिक छळ होत आहे. हुंडा म्हणून गाडी मिळवण्यासाठी मुलीच्या सासरचे तिला त्रास देत आहेत, असा आरोप ज्योतीच्या वडिलांनी लावला होता. नालंदा मॅजेस्ट्रियल कोर्टाने या प्रकरणी पती नरेश कुमार आणि त्याचे वडील सहदेव गुप्ता यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
प्रकरण नेमकं काय?
गुप्ता कुटुंबाने पाटणा हायकोर्टात या विरोधात अपील केलं होतं. ज्योतीचा शारीरिक किंवा मानसिक छळ झाल्याचं सिद्ध करणारे कोणतेही वैद्यकीय दस्तऐवज उपलब्ध नसल्याचं, हाय कोर्टाच्या निदर्शनास आलं. पाटणा हायकोर्टाने नवीन निर्णय देत नालंदा मॅजेस्ट्रियल कोर्टाचा निर्णय रद्द केला. हायकोर्टाने पती नरेश आणि सासरे सहदेव यांना जामिनही मंजूर केला आहे.
जस्टिस बिबेक चौधरी यांनी पत्नीची एक याचिकाही फेटाळली. याचिकाकर्त्याच्या वकिलाने युक्तिवाद केला होता की, 21व्या शतकात पत्नीला भूत म्हणणं हा मानसिक छळ आहे. यावर भाष्य करताना हायकोर्टानं म्हटलं की, पती-पत्नी अनेकदा एकमेकांसाठी अशी भाषा वापरतात. याला क्रूरतेच्या कक्षेत आणता येणार नाही.