सांगली समाचार - दि. २६ मार्च २०२४
मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिलेला अल्टिमेटम आज संपणार असून, आंबेडकर यांनी आज महत्वाची पत्रकार परिषद बोलावत मोठी घोषणा करण्याची शक्यता होती. मात्र, त्यापूर्वीच महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना 'आज घाईत कोणताही निर्णय घेऊ नका' अशी विनंती केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीत पुन्हा एकदा नव्याने चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, प्रकाश आंबेडकर देखील आज आपली भूमिका जाहीर करण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज महाविकास आघाडीसंदर्भात भूमिका जाहीर करणार होते. प्रकाश आंबेडकर आज आपल्या तिसऱ्या आघाडीची घोषणा करण्याची शक्यता होती. मात्र, महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांना आज घाईत कोणताही निर्णय घेऊ नका अशी विनंती केली आहे. त्यामूळे महाविकास आघाडीत आणि वंचितमध्ये आज नव्याने चर्चा होण्याची शक्यता आहे. मविआ आंबेडकरांना नवा प्रस्ताव देणार असल्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. त्यामूळे आंबेडकरांनी मविआची विनंती मान्य करीत आजऐवजी उद्या भूमिका जाहीर करण्याचं ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तिसऱ्या आघाडीची देखील घोषणा करण्याची शक्यता होती....
प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात आज महत्वाची पत्रकार परिषद बोलावली होती. अकोला लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देखील यावेळी जाहीर केल्या जाण्याची शक्यता होती. सोबतच महाविकास आघाडीपासून काडीमोड घेण्याची घोषणा देखील प्रकाश आंबेडकर करण्याची शक्यता होती. प्रकाश शेंडगेंचा ओबीसी मोर्चा, मनोज जरांगे यांना मानणारा गट आणि इतर छोट्या पक्षांना सोबत घेऊन आंबेडकर तिसऱ्या आघाडीची देखील घोषणा करण्याची शक्यता होती. तसेच तिसऱ्या आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून 29 जागा लढवल्या जाण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची आजची पत्रकार परिषद महत्वाची समजली जात होती. मात्र, आता महाविकास आघाडीच्या विनंतीनंतर आज होणारी प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद रद्द होण्याची शक्यता आहे.
प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरु : संजय राऊत
दरम्यान प्रकाश आंबेडकर आमचा संबंध संपला वंचित आता महाविकास आघाडीचा भाग नाही अशा वर्गना करणाऱ्या संजय राऊत यांनी घुमजाव केले आहे
प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत बोलतांना संजय राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत असून, ते महत्वाचे घटक आहे. वंचितसोबत आमची अनेकदा चर्चा झाली आहे. स्वतः प्रकाश आंबेडकर देखील चर्चेला उपस्थित राहिले. आमची चर्चा कालपर्यंत सुरु होती, आजही सुरु राहील. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीकडून चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला असून, तो कायम आहे. मात्र, त्या संदर्भात अजूनही काही चर्चा सुरु असून, त्या संपलेल्या नाही, असे राऊत म्हणाले आहेत.