सांगली समाचार - दि. २० मार्च २०२४
नवी दिल्ली - फेसबुकची पॅरंट कंपनी मेटाने काही दिवसांपूर्वी रेबॅनसोबत मिळून स्मार्ट गॉगल्स लाँच केले होते. या एआय-स्मार्ट गॉगल्समध्ये काही नवीन फीचर देण्यात आल्याचं मार्क झुकरबर्गने सांगितलं आहे. हे गॉगल्स आता तुम्ही एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी असल्यावर ती जागा ओळखून त्याबाबत माहिती देऊ शकणार आहे. एकूणच एखाद्या टूर-गाईडचं काम हे गॉगल्स करू शकणार आहेत.
मार्क झुकरबर्गने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन याबाबत व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पहायला मिळतंय की हे फीचर नेमकं कसं काम करेल. मार्क या व्हिडिओमध्ये माँटाना याठिकाणी आहे. तिथे असणाऱ्या रुसव्हेल्ट आर्कची माहिती हे गॉगल मार्कला देत आहेत.
या फीचरचं बेसिक व्हर्जन मेटाने गेल्या वर्षी झालेल्या मेटा कनेक्ट या इव्हेंटमध्ये सादर केलं होतं. मेटाचे गॉगल्स हे तुम्हाला रिअल-टाईम इन्फॉर्मेशन देऊ शकतील असंही यात म्हटलं होतं. यामध्ये गुगल लेन्स ज्याप्रमाणे एखादी वस्तू पाहून त्याबद्दल माहिती देऊ शकतं, त्याचप्रमाणे हे गॉगल्स देखील एआयच्या मदतीने विचारलेल्या गोष्टींची माहिती देऊ शकेल हे स्पष्ट झालं होतं.
कसे आहेत मेटाचे स्मार्ट गॉगल्स
रेबॅन मेटा स्मार्ट ग्लासेसचे तब्बल 150 कस्टमायझेबल फ्रेम आणि लेन्स ऑप्शन्स उपलब्ध आहेत. यातील अपग्रेडेड मॉडेलमध्ये उत्तम क्वालिटीचा स्पीकर आणि 12MP कॅमेरा सेन्सर दिला आहे. यामध्ये 36 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. तसंच यूजर्स याच्या मदतीने फेसबुक-इन्स्टावर थेट लाईव्ह स्ट्रीमही करू शकतात.