yuva MAharashtra कर्नाटकातील साईभक्तांसाठी सांगली रेल्वे स्थानकाचा सेतू, राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा फायदा

कर्नाटकातील साईभक्तांसाठी सांगली रेल्वे स्थानकाचा सेतू, राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा फायदा



सांगली समाचार  - दि. २८ मार्च २०२४
सांगली  - कर्नाटकातून लाखो साईभक्त वर्षभरात महाराष्ट्रातील शिर्डी देवस्थानला जात असतात. या सर्व साईभक्तांसाठी आता सांगलीरेल्वे स्थानक सेतूचे काम करणार आहे. राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस व महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या वेळा त्यांच्यासाठी सोयीच्या होणार असून यातून सांगलीतील अनेक ऐतिहासिक मंदिरांना भेट देणे कर्नाटकातील भाविकांना शक्य होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुपने याबाबत कर्नाटकातील भाविकांना सोशल मिडियावर आवाहन केले आहे. कर्नाटकातील भाविकांना थेट शिर्डीला जाण्यासाठी गाडी नाही. त्यामुळे खासगी किंवा महामंडळाच्या बसने त्यांना प्रवास करावा लागतो. गाड्या बदलाव्या लागताहेत. मात्र, आता सांगली रेल्वे स्थानकावरुन सुरु झालेल्या राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसमुळे कर्नाटकातील भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. याशिवाय सांगली शहराजवळ असलेल्या अनेक मंदिरांना भाविक भेटी देणार असल्याने त्याठिकाणचे पर्यटनही वाढणारा आहे. सांगली रेल्वे स्थानकावरील या एक्स्प्रेसमुळे बेंगलोर, हुबळी, धारवाड, दावणगिरी, बेळगाव येथील भाविनांची सोय होईल.


असा करता येणार प्रवास

प्रवासी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस दररोज रात्री ११ वाजता बेंगलोरमधून सुटते. त्या गाडीतून कर्नाटकातील संबंधित मार्गावरील साईभक्तांनी सांगली स्थानकापर्यंत यावे. ही गाडी दुपारी साडे बारा वाजता सांगलीत पोहचते. सांगलीतील काही मंदिरांना भेट देऊन सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र एक्सप्रेसने त्यांना थेट कोपरगावपर्यंत जाता येते.

परतीच्या प्रवासातही महाराष्ट्र एक्स्प्रेसने सांगलीपर्यंत सकाळी १० वाजता येता येते. याठिकाणी आणखी काही देवस्थानांना भेटी देऊन दुपारी ३ वाजता राणी चेन्नम्मा एक्सप्रेस पकडून गावी परतता येते.

या ठिकाणांना भेट देणे शक्य

सांगलीतील गणपती मंदिर, हरीपूर येथील बागेतील गणपती मंदिर, हरीपूरचे संगमेश्वर मंदिर, संगम, औदुंबर येथील दत्त मंदिर, दंडोबा अभयारण्य, काशिलिंग देवस्थान आदी ठिकाणी कर्नाटकातील भाविकांना भेट देता येऊ शकते, असे प्रवासी संघटनांनी सुचविले आहे.