yuva MAharashtra काँग्रेसच्या 'त्या' प्लॅननंतर ठाकरे आक्रमक; दिल्लीतल्या चर्चेनंतर थेट इशारा !

काँग्रेसच्या 'त्या' प्लॅननंतर ठाकरे आक्रमक; दिल्लीतल्या चर्चेनंतर थेट इशारा !



सांगली समाचार - दि. ३० मार्च २०२४
नवी दिल्ली - महाविकासआघाडीमध्ये पाच जागांवरून अजूनही वाद सुरू आहेत. सांगली, भिवंडी, मुंबई उत्तर पश्चिम, इशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या पाच मतदारसंघांसाठी काँग्रेस आग्रही आहे. यातल्या सांगली, मुंबई उत्तर पश्चिम, इशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना ठाकरे पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. तर भिवंडी मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षात वाद सुरू आहेत. या पाच जागांबाबत दिल्लीतून महत्त्वाची अपटेड समोर आली आहे.

महाविकासआघाडी तोडायची नाही, पण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दबावापुढे झुकायचं नाही, असा दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांचा सूर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे पाच मतदारसंघ सोडायचे नाहीत, यासाठी मैत्रीपूर्ण लढत करण्याची तयारीही काँग्रेसची आहे. राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बैठकीत झालेल्या या निर्णयाबद्दल दिल्ली हायकमांडला माहिती देण्यात आली, त्यानंतर हायकमांडनेही मैत्रीपूर्ण लढतीला हिरवा कंदील दिल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.


संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसच्या मैत्रीपूर्ण लढतीच्या तयारीबाबत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. 'मैत्रीपूर्ण लढतीबाबत त्यांना जाहीर करू द्या. मग उत्तर प्रदेश, बिहार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात 48 जागा आहेत, त्याच्यावरही अशा लढती करायच्या का?' असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

'काँग्रेस समंजस राजकीय पक्ष आहे, मैत्रीपूर्ण लढतीत काय होतं? हे सगळ्यांना माहिती आहे. मैत्रीपूर्ण लढत आपल्या विरोधकाला मदत करण्यासाठी केली जाते', असा टोलाही संजय राऊतांनी लगावला. तसंच शरद पवार उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार आहेत, पण तेव्हा जागांवर चर्चा होणार नाही, असंही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे.