सांगली समाचार - दि. १५ मार्च २०२४
अमरावती - ज्या समाजात जन्मलो, त्या समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेतून अमरावतीमध्येफासेपारधी समाजातील मुलामुलींच्या 'प्रश्नचिन्ह' आश्रमशाळेतून जीवनाची उत्तरं शोधलेल्या मतीन भोसले यांच्याविषयी...
जगात आजही अनेक समाजातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत. त्यापैकीच एक म्हणजे फासेपारधी समाज. आजही या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. या समाजातील लोक गावोगावी वस्ती करून राहत असतात. यांची मुले सिग्नल, रेल्वे स्थानक, बस स्थानक अशा अनेक ठिकाणी भीक मागताना दिसतात. भीक मागून गोळा केलेले पैसेही तिसर्याच माणसाच्या अथवा दलालाच्या पेटीत जमा होतात. पुढे याच संस्कारातून ही चिमुकली मुले हळूहळू व्यसनाच्या आहारी जातात. परिणामी, त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अशा या फासेपारधी समाजाची व्यथा जवळून अनुभवून, तिला ओळखून या समाजाला प्रगतीपथावर नेण्याचे काम करणारे मतीन भोसले.अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा या गावापासून तीन किमी लांब असलेल्या टेकडीवर मतीन भोसले यांचे बालपण गेले. वडिलांनी त्यांचे पहिल्या वर्गात नाव दाखल केले. मात्र, पारधी समाजाचा मुलगा शाळेतील मुलांचे दप्तर, वस्तू चोरणार असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. पण, खचून न जाता, त्यांनी 'डीएड'पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर शाळेत शिक्षक म्हणून रुजूही झाले. परंतु, 2010 मध्ये सराफा लुटण्याच्या आरोपात एका पारधी जोडप्याला शिक्षा झाली.
एकदा त्या जोडप्याची मुले खेकडे-मासे पकडण्याकरिता नाल्यात शिरली आणि पुराच्या लोंढ्यात ते दोघेही वाहून गेल्याने, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे मतीन भोसले विचलित झाले आणि त्यांना लक्षात आले की, आपली नोकरी आणि पगार केवळ आपल्यापुरताच मर्यादित आहे. आपल्या समाजाला त्याचा काहीही उपयोग नाही. याच विचारातून त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि 'भीख मांगो' आंदोलनाच्या माध्यमातून फासेपारधी समाजातील मुलांसाठी शाळा सुरू केली. हे आंदोलन करत असताना, त्यांच्यावर 28 केसेसही दाखल झाल्या. पण, तरीही ते मागे हटले नाहीत. मतीन भोसले यांनी नागपूर, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, पुणे अशा मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊन तेथील रेल्वे स्थानक, बसस्थानक व सिग्नलवरील भीक मागणारी मुले, भंगार वेचणारी मुले आणि हॉटेलमध्ये कपबशा धुवून पोट भरणारी मुले यांचा शोध घेतला. या काळात जवळजवळ अशी 188 मुले त्यांना सापडली. त्यानंतर मतीन भोसले यांनी त्या चिमुकल्यांना शाळेचे महत्त्व केवळ समजावूनच सांगितले नाही, तर मुलांना खाण्याचे पदार्थ देऊन, ते त्यांच्यासोबत काही दिवस तिथे राहिलेसुद्धा.
तिथेच 'गाडी आली गाडी आली, चला पळा रे' अशी मनोरंजनात्मक गाणी गाऊन त्या मुलांशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या मुलांना घेऊन, अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा या गावी 'प्रश्नचिन्ह' नावाची आश्रम शाळा सुरू केली व इथे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य आजही नियमितपणे सुरू आहे. जी मुले लहान असताना शाळेत शिक्षकांना दगड मारायची, तीच मुले आता 'एमपीएससी', 'युपीएससी'ची तयारी करीत आहेत.शाळा सुरू करत असताना शाळेची इमारत, निवारा, शिक्षणासाठी लागणारे साहित्य, शिक्षकांचे पगार, जेवण इत्यादी अनेक प्रश्न मतीन भोसले यांच्या समोर उभे राहिले व त्यातूनच त्यांनी 'प्रश्नचिन्ह' असे शाळेचे नाव ठेवले. व्यसनाच्या आहारी गेलेली मुले, देहव्यापाराकरिता विक्री झालेल्या मुली आज कुठल्याही गुरुशिवाय राज्यस्तरावर योग करताना दिसत आहेत. दारू, तंबाखूचे व्यसन जडलेल्या मुलांना शिक्षणाने जगण्याचा मार्ग दाखवला. काही मुली नर्सिंग महाविद्यालयात आहेत, तर काही मुले पदवी पूर्ण करत आहेत.पुढे मतीन यांनी लोकवर्गणीतून सुसज्ज इमारत, वाचनालय सगळे काही उभे केले. 'प्रश्नचिन्ह' हे उत्तराच्या मागे लागले असताना, महामार्गाच्या कामात शाळेच्या मुख्य इमारतीसह वाचनालयसुद्धा गमवावे लागले. पण, हार न मानता लोकवर्गणीतून भोसलेंनी सर्व काही नव्याने उभे केले. अशा या आश्रमशाळेतून शिकून गेलेला विद्यार्थी जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभा राहत नाही, तोपर्यंत भोसले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात.
2019 पर्यंत 'प्रश्नचिन्ह' आश्रमशाळेत शिकवणारे शिक्षक बिनपगारी होते. या शिक्षकांना वेतन मिळावे, या मागणीसाठी मतीन भोसले चार मुख्यमंत्र्यांच्या दारात गेले. परंतु, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर, त्यांनी बोलीभाषेच्या शिक्षकांना कायमस्वरुपी करण्याचा 'जीआर' काढला आणि येथील शिक्षकांना वेतन सुरू झाले.फासेपारधी समाजातील मुली शिक्षणापासून अद्याप वंचित असून, आजही त्यांचे बालविवाह होत आहेत. या मुलींना शिक्षणाची अत्यंत आवश्यकता असून, त्यांना राहण्यासाठी वसतिगृह मिळावे आणि येथेच त्यांनी सुशिक्षित होऊन समाजात आदर्श निर्माण करावा, अशी भोसलेंची इच्छा आहे. याशिवाय प्रयोगशाळा, पाण्याची टाकी, व्यायामशाळा अशा काही मूलभूत शालेय गरजा पूर्ण झाल्यास, फासेपारधी समाजातील मुलेसुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल. यासाठी समाजातील काही जागरूक मंडळींनी पुढे यावे आणि शासनानेही थोडे लक्ष घालून, 'प्रश्नचिन्ह' शाळेला उत्तराच्या दिशेने जाण्यास मदत करावी, अशी त्यांची इच्छा. म्हणूनच मतीन भोसलेंना कायमच उपेक्षा वाट्याला आलेल्या फासेपारधी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारा देवदूत म्हणण्यास वावगे ठरणार नाही.