yuva MAharashtra दूषित पाण्यावरुन खा. संजयकाकांनी सांगली महापालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे कान उपटले.

दूषित पाण्यावरुन खा. संजयकाकांनी सांगली महापालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे कान उपटले.



सांगली समाचार - दि. - ४ मार्च २०२४
सांगली - सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजयकाका पाटील यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करीत अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. अपूर्ण कामाचा जाब अधिकार्‍यांना विचारण्यात आला. याशिवाय स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आदेशही खासदार पाटील यांनी अधिकार्‍यांना दिले.

मागील काही दिवसांपासून महानगरपालिका क्षेत्रात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार खासदार पाटील यांनी महानगरपालिकेच्या माळ बंगला येथील जलशुद्धीकरण प्रकल्पास भेट दिली. प्रकल्पाची पाहणी करुन तेथील कामाबाबतची सविस्तर माहिती घेण्यात आली. 


शहरातील बहुतांशी भागाला पाणी मिळत नाही, ज्याठिकाणी पाणी येते तेथे अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांकडून विचारणा केली जात आहे, परंतु महापालिका प्रशासन दाद देत नसल्याबाबत खासदार संजय पाटील यांनी जाब विचारला. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पातून स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी. त्यासंबंधी सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची सक्त ताकीद अधिकार्‍यांना देण्यात आली.

सध्याच्या टंचाईसदृश्य परिस्थितीमध्ये पाण्याचा काटकसरीने वापरासोबतच महानगरपालिका क्षेत्रात सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना खासदार पाटील यांनी दिल्या. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त सुनिल पवार, उपायुक्त राहूल रोकडे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कुरणे, सुनील पाटील, वालचंद कॉलेजचे तज्ञ व प्राचार्य दगडे, मोहन वनखंडे, रणजित सावर्डेकर उपस्थित होते.