yuva MAharashtra सांगलीत विशाल पाटलांना उमेदवारी नाकारल्यास राज्यात चुकीचा संदेश जाईल; स्व. वसंतदादांच्या जवळच्या व्यक्तीचा शिवसेनेला संदेश

सांगलीत विशाल पाटलांना उमेदवारी नाकारल्यास राज्यात चुकीचा संदेश जाईल; स्व. वसंतदादांच्या जवळच्या व्यक्तीचा शिवसेनेला संदेश



सांगली समाचार - दि. १६ मार्च २०२४
सांगली - काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक यशवंत हाप्पे यांनी खासदार संजय राऊत यांना व्हॉटसअॅपवर एक मेसेज केलाय. या मेसेजमध्ये त्यांनी सांगली लोकसभेची जागा काँग्रेस वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांच्यासाठी असताना ही जागा शिवसेना मागत असल्याच्या अनुषंगाने काही टिप्पणी केलीय.ज्यात वसंतदादा पाटील आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाते, वसंतदादाच्या एकाच वाक्यावर मुंबईत महानगर पालिकेवर शिवसेनेची सत्ता कशी आली होती याचा दाखला दिलाय. हा दाखला देत सांगलीची काँग्रेसची दादा घराण्याची जागा शिवसेनेने हिसकावून घेतली तर सांगली बरोबरच महाराष्ट्रात वाईट संदेश कसा जाईल, हे सुचवले आहे. याशिवाय, ही काँग्रेसची जागा शिवसेनेला देण्यामध्ये काहीजण राजकीय वैरातून आणि आपल्या मुलाबाळांची राजकारणात वर्णी लावणेसाठी हा प्रयोग करत असल्याचे देखील म्हटले आहे. त्यामुळे एकीकडे सांगली लोकसभेची जागा ठाकरे गट मागत असताना वसंतदादाच्या स्वीय सहाय्यकानी संजय राऊत यांना हे पत्र लिहून एकप्रकारे ठाकरे गटाला ही जागा देण्यास विरोध करायला सुरुवात केलीय.

पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?

स्व. वसंतरावदादा पाटील व हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा एकत्रित फोटो मी आपल्याला पाठवित आहे. शिवसेना ही संघटना म्हणून स्थापन झाली, त्यावेळी दादा व शालीनीताई पाटील त्या कार्यक्रमाला जातीने हजर होत्या. यावरून या दोघांचे काय संबंध होते हे आपल्या लक्षात येईल. डॉ. हेमचंद्र गुप्ते व श्री. मनोहर जोशी सर हे महापौर पदाचे उमेदवार असतांना काँग्रेस पक्षाची मते मिळवून देण्यासाठी दादांनीच मदत केलेली आहे, याचा मी साक्षीदार आहे. कारण त्यावेळेपासून ते दादांच्या अखेरच्या क्षणापर्यंत मी दादांचा व्यक्तीगत सहाय्यक म्हणून कार्यरत होतो. त्यांचा मानसपुत्र म्हणूनही महाराष्ट्रात माझी ओळख आहे. त्याचा मी गाजावाजा कधी केला नाही आणि करतही नाही. 


१९८५ साली महानगरपालिकेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मराठी उमेदवारांना डावलले जात आहे हे लक्षात आल्यावर दादांनी एकच वाक्य वापरले " मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्रात दिसला पाहिजे" या एकाच वाक्यावर मुंबईत महानगर पालिकेवर शिवसेनेची सत्ता आली. ही बाब सा-या महाराष्ट्राला ज्ञात आहे. १ मार्च १९८९ रोजी दादांचे निधन झाले त्यावेळी बाळासाहेबांनी " वटवृक्ष कोसळला" या मथळ्याखाली एक अग्रलेख लिहिला होता तो सापडल्यास आपण तो वाचून पाहिल्यास आपल्याला हे लक्षात येईल की दादा आणि बाळासाहेबांचे काय भावनिक नाते होते ते.

एवढं सगळं लिहिण्याच प्रयोजन यासाठी की, सांगलीची लोकसभेची जागा शिवसेना मागून घेतेय आणि त्या ठिकाणी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली जाणार आहे. हे असे झाले तर दादा घराण्याची जागा शिवसेनेने हिसकावून घेतली असा एक वाईट संदेश सांगली बरोबरच महाराष्ट्रात जाईल आणि त्याचा एक वाईट परिणाम शिवसेनेच्या बाबतीत बाबतीत घडू शकतो. जे लोक आपल्याला हे सूचवत आहेत ते आपले राजकीय वैर शमवून घेण्यासाठी सूचवित आहेत. २०१४ साली प्रतिक पाटील हरले ते मोदी लाटेमुळे,२०१९ साली कांग्रेसच्या कांही नेत्यांनी (त्याच्यामध्ये श्री.अशोक चव्हाण यांचा प्रामुख्याने सहभाग होता) ही जागा जाणीवपूर्वक शेतकरी संघटनेला सोडली व विशाल पाटलांना तिकडून उमेदवारी घ्यायला सांगितली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दुस-या पक्षाकडून उमेदवारी मिळूनही विशाल पाटील यांनी साडेतीन लाख मते घेतली. 

वंचित बहुजन आघाडीकडून उभा राहिलेला उमेदवार हा धनगर समाजाचा होता. या समाजाचे मतदार संघात प्राबल्य असल्याने त्याने ३ लाखांपर्यंत मते घेतली त्यामुळे श्री. विशाल पाटील यांचा पराभव झाला. हा जो कोणी उमेदवार जे कोणी आपल्या माथी मारत आहेत त्याचे पैलवानकी शिवाय काय योगदान आहे ? निवडून येण्यासाठी ते कोणत्या कसोटीला उतरु शकतात? काहींजण आपले राजकीय वैर शमविण्यासाठी व आपल्या मुलाबाळांची राजकारणात वर्णी लावणेसाठी ही खेळी करीत आहेत. त्याचा आपल्याला फायदा होण्याऐवजी नुकसानच होऊ शकते, हे आपण लक्षात घ्यावे. हेच सुचविण्यासाठी आपल्याला मी हा मेसेज करीत आहे. असे यशवंत आप्पे यांनी या पत्रात म्हटलेले आहे.