yuva MAharashtra "मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास ५० रुपये दंड..", महिला बचत गटाचा 'तो' कथित कॉल पवार गटाकडून व्हायरल

"मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास ५० रुपये दंड..", महिला बचत गटाचा 'तो' कथित कॉल पवार गटाकडून व्हायरल




सांगली समाचार - दि. ५ मार्च २०२४
मुक्ताईनगर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास ५० रुपये दंड केला जाणार आहे अशी तक्रार महिला बचत गटाने केली आहे. यासंदर्भातली पोस्ट आणि दोन महिलांचा कॉल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने पोस्ट केला आहे.

काय आहे राष्ट्रवादीची पोस्ट ?

मुक्ताईनगर तालुक्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमानिमित्त भूमिपूजनासाठी येणार होते, महिला बचत गटाच्या महिला भगिनींनी माझ्याशी संपर्क साधून मला असे सांगितले की, 'मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला येण्यासाठी आमच्यावर दबाव आणला जात आहे. आम्ही जर उपस्थित नाही राहिलो तर, आमच्याकडून ५० रुपये दंड आकारला जाईल, बचत गटातून काढून टाकण्यात येईल आणि कारवाई केली जाईल. असे बचत गटाच्या अध्यक्षा तसेच आमदारांच्या कार्यकर्त्या ज्योत्स्ना महाजन यांनी सांगितले आहे.' त्या महिला बचत गटाच्या भगिनींनी मला काही स्क्रीन शॉट आणि रेकॉर्डिंग ऐकवलेल्या आहेत.


महिला भगिनींना दमदाटी करण्याचा ज्या ज्योत्स्ना महाजन प्रयत्न करत आहेत, त्यांना मी फोन करून शहानिशा केली त्यावर त्यांनी त्याची कबुली देखील दिलेली आहे. आमची सरकारला एकच विनंती आहे की, 'या महिला बचत गटात ज्या भगिनी काम करतात त्यांची परिस्थिती बिकट आहे. आज त्यांना हाताला काम पाहिजे. आज कोणाची मुले, सासू-सासरे आजारी असू शकतात. कोणाला शेतात जायचे असेल. दिवसाचा रोज पाडून त्यांना जर कार्यक्रमाला जाणे शक्य नसेल तर त्यांच्यावर जबरदस्ती कशासाठी केली जात आहे ?' मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की, 'आपल्या कार्यक्रमाला ज्यांना मनाने यायचे आहे. त्यांना यायला कोणीही थांबवत नाही. आम्ही विकासाच्या बाजूने आहोतच. मुख्यमंत्र्यांचे स्वागतच आहे मुक्ताईनगर तालुक्यात, पण माता भगिनींना त्रास देऊन किंवा त्यांना जबरदस्तीने कार्यक्रमाला आलंच पाहिजे. ही जी भूमिका आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे, त्यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे आणि योग्य ती कारवाई करावी, अशी आमची अपेक्षा असल्याचे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी व्यक्त केली आहे.