yuva MAharashtra युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदावरून मंगेश चव्हाण निलंबित

युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदावरून मंगेश चव्हाण निलंबित

 


सांगली समाचार- दि. १ मार्च २०२४

सांगली - युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मंगेश चव्हाण यांना राष्ट्रीय युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी उदय भानू यांनी निलंबित केले आहे. निष्क्रियतेवरून चव्हाण यांच्यासह राज्यातील विविध १४ पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान, ही कारवाई जाणीवपूर्वक असून कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

राष्ट्रीय युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सूचनेनुसार कार्यक्रम आयोजित न करणे, राज्य कार्यकारिणीच्या बैठकांना गैरहजर राहणे, पक्षसंघटनेतील कामकाज असमाधानकारक असणे आदी कारणावरून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या १४ पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना पदावरून निलंबित केले आहे. 

दरम्यान, या कारवाईसंदर्भात मंगेश चव्हाण म्हणाले, प्रदेश युवक काँग्रेसकडून होणाऱ्या कोणत्याही बैठकांना अथवा कार्यक्रमांना मला निरोप दिलेला नव्हता. त्यामुळे बैठका व कार्यक्रमांना उपस्थित नसल्याचा आरोप चुकीचा आहे. जिल्ह्यातील काहींच्या सांगण्यानुसार जाणीवपूर्वक माझ्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचा संशय आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद असताना महागाईसह विविध मुद्यांवर आंदोलने केली होती. १३ वर्षे काँग्रेस पक्षाचे काम करत पक्षसंघटन केले. अनेक युवक काँग्रेसच्या प्रवाहात, सामील झाले. आक्रमक आंदोलनामुळे गुन्हे देखील दाखल झाले होते. काँग्रेसचे काम प्रामाणिकपणे सुरूच ठेवले होते. तरीही निलंबनाची कारवाई झाली आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. कार्यकत्यांशी विचारविनिमय करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.