सांगली समाचार - दि. १० मार्च २०२४
नवी दिल्ली - महाराष्ट्राचा विकास व्हावा, पक्ष वाढवा, आणि मोदींच्या नेतृत्वात भारताचा होणारा विकास ही कारणं देत अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात तेल लावलेला पैलवान म्हणून ओळख असणाऱ्या शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत घरोबा केला. या घरोब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवारांकडून दावा सांगण्यात आला. तो दावा खरा ही ठरला, निवडणूक आयोगाने अजित पवारांची राष्ट्रवादी हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा निकाल दिला. पण भाजपसोबत जाऊन राष्ट्रवादीची वाढ होईल का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे लोकसभा जागा वाटपमध्ये महायुतीत सगळ्यात कमी जागा या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पण मग ९ लोकसभा आणि ९० विधानसभा या आश्वासनाचे काय असा प्रश्न अजित पवारांच्या कार्यकर्त्यांसमोर उभा आहे. नेमकं काय घडतंय, जाणून घेऊया.
लोकसभा जागा वाटपामुळे महायुतीचा भाग असणारी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि खुद्द अजित पवार ही नाराज असल्याची कूजबूज सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे, दोन दिवसांपूर्वी भाजपचे चाणक्य म्हणून संबोधले जाणारे अमित शहांच्या उपस्थितीत अजित पवार, एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे जास्तीत जास्त खासदार दिल्लीत पाठवायचे असल्याबाबत चर्चा झाल्याचं बोललं गेलं. याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कमी जागा मिळणार हे चित्र स्पष्ट झालं पण, सध्यस्थितीला अजित पवारांकडे लोकसभेचे सुनिल तटकरे एकमेव खासदार आहेत. तुलनेने शिंदेंच्या याबाबत पारडे भक्कम आहे, लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेचे १३ खासदार आहेत. त्यामुळे शिंदेंना अजित पवारांपेक्षा जास्त जागा मिळतील हे नक्की, पण अजित पवार गटाचे आक्रमक नेते छगन भुजबळांनी आम्हालाही शिंदें इतक्यात जागा मिळाव्या ही मागणी केली आहे. पण ते आता तरी शक्य वाटत नाही.
या सर्व चर्चांमध्ये दिल्लीमध्ये एक बैठक पार पडली, अमित शहांसोबतच्या बैठकीआधी अजित पवारांनी प्रफुल पटेंलांच्या घरी एक वेगळी बैठक घेतली यामध्ये प्रफुल पटेलांसोबत जागावाटपाबाबत चर्चा झाली. ही बैठक तब्बल एक तास पार पडली. या बैठकीनंतरच बातम्या आल्या त्या म्हणजे अजित पवार नाराज असल्याच्या आणि याचं कारण ठरलं म्हणजे भाजपसोबत जाताना ठरलेला कथित नऊ ९० चा फॉर्म्युला....
भाजपसोबत जाण्याआधी अजित पवारांनी लोकसभेच्या नऊ आणि विधानसभेच्या ९० जागांची मागणी केल्याचे सांगण्यात येतं. त्यानुसारच अजित पवार महायुतीत सामील झाले. पण आता हा फॉर्म्युला पाळला जात नसल्याचे अजित पवार नाराज झाले आहे. अर्थात ते अजूनही रिचेबल आहेत पण लोकसभा जागावाटपावेळी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दबाव टाकून जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महायुतीतील जागा वाटपाचा गुंता येणाऱ्या आठवड्यात सुटेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार, त्यावरती त्यांचे समाधान होईल का?, हे प्रश्न नक्कीच कळीचा मुद्दा ठरणार आहे.