Sangli Samachar

The Janshakti News

"राहुल गांधी पंतप्रधान होत नाहीत तोवर उधारी बंद"



सांगली समाचार - दि. २२ मार्च २०२४
मुंबई - तुम्ही सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मार्केटिंग व्हिडिओ पाहिले असतील. आजकाल लोक मार्केटिंगसाठी आणि प्रसिद्ध होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. आपला व्यवसाय, धंदा वाढावा, वस्तूंचा खूप खप व्हावा असे कोणत्या दुकानदाराला वाटणार नाही. यासाठी दुकानदार वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पोस्टर लावतात. परंतू, एका दुकानदाराने उधारी बंद करण्यासाठी एक अट घालून पाटी लावली आहे. ती वाचून लोकांनीदेखील उधारी मागणे बंद केले आहेत. दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकांनी उधारी मागू नये यासाठी दुकानात 'उधारी बंद आहे', 'आज रोख उद्या उधार' अशा अनेक पाट्या आपण पाहिल्या आहेत. मात्र आता ही अनोखी पाटी पाहायला मिळाली.


आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये रस्त्यावरील एका विक्रेत्याने उधारी बंद करण्यासाठी अजब मार्ग शोधला आहे. एका रस्त्यावरील विक्रेत्याने त्याच्या स्टॉलवर लावलेला बोर्ड सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, 'राहुल गांधी भारताचे पंतप्रधान होईपर्यंत. उधारी बंद आहे.' असा बोर्ड या विक्रेत्यानं लिहला आहे. ही अट शहरभरात चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड होताच हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

लोकांच्या प्रतिक्रिया पहा

@azizkavish नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ६ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. यावर अनेक यूजर्स आपापल्या प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले…कोणताही मूर्खपणा करू नका. आणखी एका युजरने लिहिले..भाऊ, मी तुमच्याकडून पुन्हा उधारी घेऊ शकणार नाही. तर दुसऱ्या युजरने लिहिले… भाऊ १ महहिन्यानंतर हा बोर्ड काढा.