सांगली समाचार - दि. २२ मार्च २०२४
मुंबई - लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकीची तयारी सुरू असताना अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे महायुतीमधील घटक पक्षांवर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. आम्हाला विचारात घेतलं जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच 11 एप्रिलला अंतिम निर्णय घेणार असल्याचा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे.
बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष राज्यात महायुतीत असला तरी आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीसाठी विचारात घेतले जात नाही, अशी नाराजी व्यक्त करत बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांत बैठका व बांधणी करून सर्वसामान्य गोरगरीब शेतमजूर, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करून 11 एप्रिल रोजी अंतिम निर्णय जाहीर करू असं बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मिळाव्यात सांगितल. पक्षाची व्यवस्थित बांधणी केली, प्लॅनिंग केलं तर पश्चिम विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघांपैकी एका मतदारसंघातून प्रहारचा खासदार निश्चित निवडून येईल, असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता येत्या 11 एप्रिल रोजी बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडून वेगळी चूल मांडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून घटक पक्षांची मोट बांधली जात आहे. त्यामुळे नाराज बच्चू कडू यांची नाराजी भाजप कशी दूर करणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.