yuva MAharashtra ...तर किडनी विकू; अमेरिकेत बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याच्या वडिलांना आला धमकीचा फोन

...तर किडनी विकू; अमेरिकेत बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याच्या वडिलांना आला धमकीचा फोन



सांगली समाचार - दि. २१ मार्च २०२४
नवी दिल्ली - अमेरिकेत एका भारतीय विद्यार्थ्याचे अपहरण झाले आहे. हैदराबादमध्ये राहणाऱ्या या विद्यार्थ्याच्या पालकांना अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून मुलाचे अपहरण झाल्याचे कळविले. तसेच पैसे दिले नाही किंवा पोलिसांना माहिती दिल्यास मुलाचे मूत्रपिंड विकण्याची धमकीही दिली.

अब्दुल महंमद (वय २५) हा मे २०२३ मध्ये अमेरिकेला गेला होता. ओहिओतील क्लिव्हलँड विद्यापीठात माहिती व तंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. ७ मार्चपासून अब्दुलशी संपर्क झाला नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. अब्दुलचे वडील महंमद सलीम यांना गेल्या आठवड्यात एका अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी आला होता. क्लिव्हलँडमधील अमली पदार्थ विक्रेत्यांनी त्यांच्या मुलाचे अपहरण केले असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. अब्दुलच्या सुटकेसाठी बाराशे डॉलरची (सुमारे एक लाख रुपये) मागणीही संबंधित व्यक्तीने केली. मात्र पैसे कोणत्या मार्गाने द्यायचे हे सांगितले नाही. पैसे देण्यास नकार दिल्यास विद्यार्थ्याचे एक मूत्रपिंड माफियांना विकण्याची धमकीही दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.


भारतीय दूतावासाला पत्र

धमकीच्या दूरध्वनींतर सलीम यांनी अमेरिकेत राहणाऱ्या नातेवाइकांशी संपर्क साधला. त्यांनी क्लिव्हलँड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. अब्दुल शेवटचा दिसला तेव्हा त्याने पांढरा टी-शर्ट, लाल रंगाचे जॅकेट आणि निळ्या रंगाची जीन्स असा पेहराव केल्याचे पोलिस तपासात निदर्शनास आले आहे. त्याच्या पालकांनी शिकागोतील भारतीय दूतावासाला पत्र लिहून मदत मागितली आहे.