सांगली - कुपवाडमध्ये दोन दिवसापुर्वी बंद घरातून चोरीस गेलेले ५ लाख ३१ हजाराचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करुन सराईत चोरट्याला मंगळवारी गजाआड केले. संशयिताने चोरीचा ऐवज लाकडी पेटीत ठेऊन घरामागील शेतात पुरला होता.वैजयंता महादेव बेरडे, (रा. मंगलमुर्ती कॉलनी, कुपवाड) या त्यांचे कुटूंबियांसोबत त्यांचे मुळ गावी कर्नाटक येथे गेले असता, त्यांचे राहते घराचा दरवाजा कशाने तरी उचकटून आत प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला होता. याबाबत दि. ९ मार्च रोजी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.
पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर अधिक्षक रितु खोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण व संजयनगर पोलीस ठाण्यास संशयिताचा तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताच्या शोधासाठी पथक कार्यरत होते. उप निरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकामधील हवालदार बिरोबा नरळे यांना ही घरफोडी करणाऱ्या संशयिताची माहिती मिळाली.
या माहितीनुसार आपटा पोलीस चौकीजवळ संशयित आकाश सतीश कवठेकर (वय २६ वर्षे, रा. भारत सुतगिरणीजवळ, कुपवाड) याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली.त्याने चोरीतील ५ लाख १९ हजाराचे २३ तोळे सोन्याचे दागिने व १२ हजाराचे चांदीचे दागिने उमेदनगर, कुपवाड येथील राहत्या घराच्या पाठीमागील मोकळया शेतात लाकडी पेटीत पुरून ठेवले असल्याचे सांगितल्याने सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांनी सर्व मुद्देमाल जप्त केला. कवठेकर हा पोलीस दप्तरी सराईत गुन्हेगार नोंद असून त्याचेवर सांगली, सोलापुर जिल्हयात घरफोडी चोरी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत असे निरीक्षक श्री. शिंदे यांनी सांगितले.