yuva MAharashtra जोडीदाराच्या मोबाईलमध्ये घुसण्यात भारतीय पुढे

जोडीदाराच्या मोबाईलमध्ये घुसण्यात भारतीय पुढे



सांगली समाचार - दि. २३ मार्च २०२४
मुंबई - तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एकीकडे आपलं आयुष्य सोपं झालं असतानाच, नवीन प्रकारच्या समस्याही पुढे येत आहेत. खऱ्या आयुष्यातील व्हॉयलेंस प्रमाणेच इंटरनेटवर डिजिटल व्हॉयलेंस दिसून येत आहे. सुरुवातीला हे केवळ सोशल मीडियावरील ट्रोलिंगपुरतं मर्यादित होतं. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये एकमेकांवर पाळत ठेवण्यासाठी, हेरगिरीसाठी किंवा मग पार्टनर वा एक्सची हेरगिरी करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो आहे. यामुळे नव्या प्रकारचा डिजिटल व्हॉयलेंस वाढत चालला आहे.

सायबर सिक्युरिटी कंपनी कास्परस्कायने एक नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये कोणत्या देशातील लोक अशा प्रकारची हेरगिरी करण्यात पुढे आहेत याबाबत माहिती दिली आहे. 'स्टेट ऑफ स्टॉकरवेअर रिपोर्ट 2023' नुसार या यादीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्टॉकरवेअर अ‍ॅपच्या  मदतीने कित्येक भारतीय आपल्या पार्टनरवर लक्ष ठेऊन असतात, असं यात म्हटलं आहे.


या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर रशिया, तर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील हे देश आहेत. कोरोना काळामध्ये अशा तक्रारींची संख्या कमी झाली होती. मात्र, आता यांची संख्या पुन्हा वाढत असल्याचंही या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं.


कशी होते हेरगिरी?

कित्येक प्रकरणांमध्ये एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या मोबाईलमध्ये हेरगिरी करणारे अ‍ॅप्स इन्स्टॉल करते. यासाठी स्टॉकरवेअर अ‍ॅप्स, अँटी थेफ्ट अ‍ॅप, पॅरेंटल कंट्रोल अ‍ॅप किंवा अशाच अन्य अ‍ॅप्सची मदत घेतली जाते. यानंतर आपल्या पार्टनरचे मेसेज, फोटो, नोटिफिकेशन, कॅमेरा आणि सोशल मीडिया अशा गोष्टी या व्यक्तीला समजत राहतात. याचाच वापर करुन पुढे मानसिक त्रास देणे, ब्लॅकमेल करणे, घटस्फोटाची मागणी करणे, छळवणूक करणे अशा गोष्टी केल्या जातात.

कशी घ्यावी खबरदारी ?

तुमच्या फोनमध्ये असं एखादं स्पायवेअर आहे का हे तपासण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

तुमच्या फोनची बॅटरी अचानक जास्त लवकर संपत असेल, तर एखादं अ‍ॅप बॅकग्राउंडला चालत असू शकतं.

तुमच्या फोनचा कॅमेरा वापरला जात असताना स्क्रीनवर वरच्या उजव्या कोपऱ्यात एक ग्रीन डॉट दिसेल. हा डॉट आपोआप येत असेल, तर समजून जा की एखादं अ‍ॅप विना परवानगी कॅमेरा वापरत आहे.

तुमच्या फोनमधील गरजेचे नसलेले सगळे अ‍ॅप्स काढून टाका.

संपूर्ण फोनच हॅक झाला असल्याची भीती असेल, तर तुम्ही फॅक्टरी रीसेटचा पर्याय वापरू शकता. अर्थात, तुमच्या डेटाचा बॅकअप घेणं विसरू नका.

आपल्या सोशल मीडिया हँडल्स आणि जीमेल अकाउंटचे पासवर्ड वेळोवेळी बदलत रहा.