सांगली समाचार - दि. ९ मार्च २०२४
ईश्वरपूर - उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवाल तर उद्योग कसे येतील? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी राज्यातील उद्योग पळवले जातात, अशी टीका केली होती. यावर आता मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे. सांगली जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आपल्या राज्यावर विश्वास असल्याने आपल्याकडे उद्योग येत आहेत. महाविकास आघाडीमधील लोकं सांगतात की, उद्योग पळाले. पण उद्योगपतीच्या घराखाली तुम्ही बॉम्ब ठेवाल तर ते पळतील नाहीतर काय करणार? त्यांना एक विश्वास द्यावा लागतो. सरकारमध्ये आल्यावर मी दावोसमध्ये जाऊन दोन वर्षात ५ लाख कोटींचे करारनामे केलेत आणि ३ लाख लोकांना रोजगार मिळणार आहे."
"विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते कायम आरोप करत असतात. पण मी त्यांच्या आरोपांचं उत्तर कामातून देणार आहे आणि जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. हे चोरलं, ते चोरलं असं काही लोकांचं रडगाणं सुरु आहे. पण चोरायला ती काही वस्तु नाही. ते विचार आहेत. बाळासाहेबांची भुमिका घेऊन राज्यात आपण सरकार स्थापन केलं आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "आम्ही कुठलेही निर्णय राज्यकर्त्यांच्या हितासाठी घेतले नाही तर लोकांच्या हितासाठी घेतले आहेत. काही लोकं गरिबी हटाओ म्हणायचे पण गरिबी हटली नाही तर गरीब संपला. मात्र, मोदीजींनी २५ कोटी लोकांना गरिबीतून वर काढले आहे," असेही ते म्हणाले.