सांगली समाचार - दि. १० मार्च २०२४
इचलकरंजी - देशावर कर्ज 100 रुपयांपैकी 24 रुपयांचे होते. या सरकारने हे कर्ज 84 रुपयांवर नेले. 2014 ते 2024 या कालावधीत 24 रुपयावरुन 84 रुपयांवरती नेले. यासंदर्भात जागतिक बँकेनेही भारताला इशारा दिला आहे. आपला पगार समजा 10 हजार आहे आणि बँकेचा 10 हजारांचा हफ्ता असेल तर आपली चूल कशी पेटणार, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले.
इचलकरंजी येथे वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, पुन्हा हेच सरकार सत्तेत आणल्यास दरवर्षी कर्ज वाढत राहणार आहे. सध्या देशावर 84 रुपयांचे कर्ज आहे. हे 2026 ला 100 रुपयांचे कर्ज करतील. देशावर कर्ज उभा करुन मी सन्यास घेतो असे सांगतील. देशाला बुडवून हे सन्यास घेतील. देशाला बुडवणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान म्हणून संधी द्यायची का? हे ठरवा, असे आवाहन त्यांनी केले.
मोदींच्या सरकारने भारतीय एअरफोर्सची वाट लावली. मनमोहन सिंगांच्या काळात 135 विमाने फ्रान्सकडून विकत घ्यायची होती. आता, किती राफेल आले सांगा आणि किती विकत घ्यायचे होते तेही सांगा. केवळ 35 विमाने आली. उरलेले 100 विमाने कधी येणार आहेत ? असा सवाल त्यांनी केला आहे. केंद्रातील मोदी सरकारने या देशाच्या संरक्षण व्यवस्थेचा खेळ केला आहे. सामान्य माणसाला लष्करातील कॉनवेची माहिती द्या. मी त्यांना आवाहन करतो, लष्करात असताना किती गाड्यांचा ताफा असतो आणि तेवढ्याच गाड्या का ठेवतात ? याची माहिती सर्वसामान्य माणसाला द्या.पुलवामामध्ये त्यांनी तसे का केले नाही, हे विचारा. मोदींना आम्ही विचारतो की, 80 गाड्यांचा ताफा कसा झाला. ज्या मेजरने 80 गाड्यांचा ताफा केला. त्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.